खाकीतील ‘माणुसकी’! अन् त्याचा राग क्षणात मावळला, वाढदिवस सुद्धा साजरा केला, नागपूरकरांचा आनंद गगनात मावेना
Nagpur Wathoda Police : एका खास कारणासाठी 10 वर्षांचा मुलगा रागावला. आता आपल्याला या घरात राहायचे नाही, असं ठरवून तो घरातून निघून गेला. पोलिसांनी वेळीच दखल घेत, त्याला शोधलं. केवळ शोधलंच नाही तर त्याचा हट्ट पण पुरवला. त्यामुळे नागपूरकरांनी या पोलिसांना सलाम केला आहे.

पोलीस म्हटले की अनेकदा निष्ठुर, दमदाटी करणारे असे काहीसे चित्र निर्माण झाले आहे. पण नागपूरमध्ये पोलिसांच्या माणुसकीचे हे चित्र इतर सर्व समजावर भारी ठरलं आहे. नागपूर पोलिसांच्या या संवेदनशीलतेने अनेक आयांच्या डोळ्यात पाणी तरळले आहे. एका खास कारणासाठी 10 वर्षांचा मुलगा रागावला. आता आपल्याला या घरात राहायचे नाही, असं ठरवून तो घरातून निघून गेला होता. त्याला तातडीने शोधून काढत पोलिसांनी त्याचा एक खास हट्ट पण पुरवला.
अन् त्याने सोडले घर
संचित अरविंद नरड हा 10 वर्षांचा आहे. 30 जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस होता. पण काही कारणामुळे त्याचा वाढदिवस काही त्याच्या घरच्या मंडळींना साजरा करता आला नाही. आपला साधा वाढदिवसही साजरा केल्या जात नसल्याने संचित एकदम खट्टू झाला. रागावलेल्या संचितने मग घर सोडण्याचा टोकाचा निर्णय घेतला. सकाळी 11 वाजता तो निघून गेला. बराच वेळ झाला तर संचित दिसत नसल्याने त्याच्या आई-वडिलांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला. नंतर त्यांनी थेट वाठोडा पोलीस ठाणे गाठले.




पोलिसांनी तात्काळ घेतला शोध
आई-वडिलांनी आपबित्ती सांगितल्यावर पोलिसांनी तात्काळ त्याचा शोध सुरू केला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथकं तयार केली. त्याचा शोध सुरू केला. दुपार उलटूनही त्याच थांगपत्ता न लागल्याने सर्वांचीच चिंता वाढली. पण पोलिसांचे तपासचक्र सुरूच होते. संध्याकाळी सात वाजता तो स्वामीनारायण मंदिर परिसरात सुखरूप असल्याचे समजले. त्याला पाहताच आईने हृदयाशी घट्ट धरले आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. वडिलांनाही गलबलून आले.
पोलिसांनी केक आणला
वाढदिवस साजरा न केल्याने रागात संचितने घर सोडले होते. त्याचे घर सोडून जाण्याचे हेच कारण होते. पोलिसांनी त्याचा हा हट्ट् सुद्धा पुरवला. पोलिसांनी केक आणला. त्याचा वाढदिवस साजरा केला. पोलिस, आई-वडिलांच्या सोबत त्याने केक कापला. हॅप्पी बर्थ डे टू यू या वाक्याने संचितच्या चेहऱ्यावर फुलेले हास्य हे पोलिसांसाठी एखादा मेडलपेक्षा पण मोठे होते. रोजच्याच हाणामारी, खून, दरोडे, अत्याचाराच्या वार्तांमध्ये संचितचा वाढदिवसाने पोलिसांच्या मनातील हळवा कोपराही समोर आणला.