नागपूर जिल्ह्यातील भूजल पातळी पाच वर्षांमध्ये यंदा चांगली, कळमेश्वर तालुक्यात भूजल पातळीत सर्वाधिक वाढ
भूवैज्ञानिक विभागानं (Geological Survey) जानेवारी महिन्यात पाणीपातळीची नोंद घेतली. या नोंदीचा अहवाल प्राप्त झाला. या नोंदीनुसार, सर्वाधिक पाणीपातळीत वाढ ही कळमेश्वर तालुक्यात दिसून आली. कळमेश्वर तालुक्यात 2.04 मीटरने, भिवापूरमध्ये 1.82 मीटर, कामठीत 1.81 मीटर व इतरही तालुक्यांची पाणी पातळीतही वाढ झाली.
नागपूर : वरिष्ठ भूवैज्ञानिक (Geological Survey) विभागाकडून वर्षातून चारवेळा भूजल पातळीचे निरीक्षण करण्यात येते. जानेवारी, मार्च, एप्रिल व ऑक्टोबर या महिन्यांत निरीक्षण करण्यात येते. यंदा नागपूर जिल्ह्यातील 111 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. जानेवारी 2022 ची सर्वच तालुक्यातील सरासरी पाणी पातळी 2.04 ते 0.55 मीटरदरम्यान वाढली. याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. याचा अर्थ पाण्याचा अतिरिक्त वापर करा, असा होत नाही. मे व जून महिन्यात ही पातळी खालाविण्याची शक्यता आहे. भूजलातील उपसाही आटोक्यात ठेवावा लागेल. दोनशे फुटांपेक्षा जास्त खोल बोअरवेल खोदू नये, असे भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा (Groundwater Survey and Development System) नागपूरच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. वर्षा माने (Geologist Dr. Varsha Mane) यांनी सांगितलं.
कळमेश्वर तालुक्यात सर्वाधिक वाढ
नागपूर जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. ही वाढ गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. कळमेश्वर तालुक्यात 2.04 मीटरने भूजल पातळीत वाढ झाली. सर्वात कमी वाढ 0.47 मीटरने काटोल तालुक्यात झाली आहे. याचा फायदा रब्बी पिकांना होणार आहे. उन्हाळ्यात भाजीपाल्याची पिके घेता येणार आहेत. शिवाय उन्हाळ्यात गुराढोरांनाही पाण्याची समस्या भेडसावणार नाही. गेल्या वर्षी चांगला पाऊस पडला. शिवाय कोरोनामुळं पाण्याचा अतिरिक्त उपसा कमी झाला. याचे सकारात्मक परिणाम आता दिसायला लागले आहेत.
चांगल्या पावसाचा परिणाम
बोअर खोदून जमिनीतून अतिरिक्त उपसा केला जातो. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळं भूजल पातळी खोल जाते. पण, गेल्या वर्षीच्या पावसाळ्याच पावसाने चांगलीच हजेरी लावली. विहिरी, तलाव, प्रकल्प मुबलक प्रमाणात भरले. त्यामुळं भूजल पातळीत वाढ झाली. गेल्या दोन वर्षांत काही कंपन्या बंद होत्या. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पाण्याचा उपसा कमी प्रमाणात झाला. या सर्व कारणांमुळं भूजल पातळी उंचावली. भूवैज्ञानिक विभागानं जानेवारी महिन्यात पाणीपातळीची नोंद घेतली. या नोंदीचा अहवाल प्राप्त झाला. या नोंदीनुसार, सर्वाधिक पाणीपातळीत वाढ ही कळमेश्वर तालुक्यात दिसून आली. कळमेश्वर तालुक्यात 2.04 मीटरने, भिवापूरमध्ये 1.82 मीटर, कामठीत 1.81 मीटर व इतरही तालुक्यांची पाणी पातळीतही वाढ झाली.