नागपूर : मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे 50 टक्के अजूनही पडले आहेत. जवळपास 600 कोटी अखर्चित आहेत. याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केली. नागपुरात पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.
रणजित पाटील म्हणाले, खाबुगिरीमध्ये हे राज्य सरकार व्यस्त आहे. जनतेसाठी गंभीर नाही. महाविकास आघाडी सरकार दोन वर्षात फेल झालं असा आरोपही त्यांनी केला.
कोरोनाचा मुकाबला करत असताना राज्य सरकारला अपयश आले. जनादेशाच्या विरुद्ध हे महाविकास आघाडी सरकार आलं. कोणाचा किती शेअर असेल यात हे सरकार गुंतून आहे, असा आरोपसुद्धा रणजित पाटील यांनी केला. केंद्रानं कोरोना काळात मदत केली नसती तर परिस्थिती गंभीर झाली असती, असा टोला राज्यसरकारला लगावला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना काळात महाराष्ट्र पालथा घालत होते. पण राज्याचे मुख्यमंत्री मंत्रालयात सुद्धा गेले नाही. घरीच होते, अशी टीकाही त्यांनी केली.
कोरोनासाठी आलेल्या साहित्यातसुद्धा भ्रष्टाचार झाला आहे. डझनभर मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या कुंडल्या आहेत. अधिवेशनापासून सरकार पळ काढते. नागपुरात होणार अधिवेशनसुद्धा अजून संभ्रमात आहे. सरकारला संसदीय कामापासून पळ काढायचा आहे. जनतेच्या प्रश्नावर उत्तर द्यायच नाही, असंही रजणित पाटील म्हणाले.
केंद्रानं डिझेल पेट्रोलवरचे दर कमी केले. मात्र राज्य सरकार कर कमी करायला तयार नाही. परमविरसिंग मुंबईत दाखल झाले असतील तर आता कायदा आहे. त्याला अनुसरून कारवाई होईल. बिझनेस अडवायझरी कमिटी अधिवेशन संदर्भात निर्णय होईल. नागपूर कराराप्रमाणे नागपुरात अधिवेशन व्हायला पाहिजे. विदर्भातील प्रश्न मार्गी लागायला पाहिजे. महापालिका निवडणुका कोरोनामुळं पुढं ढकलली जात असेल त्याला माझा किंवा पक्षाचा विरोध नसेल. आरोग्य आधी महत्वाचं आहे, असंही रणजित पाटील यांनी सांगितलं.
राज्य सरकार रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटसुद्धा लावू शकलं नाही. हे नियोजन शून्य सरकार आहे. ऑक्सिजन प्लांटची काय अवस्था अतिशय वाईट आहे. 50 टक्केच प्लांट उभे आहेत. प्रत्येक हॉस्पिटलचं ऑडिट केलं गेलं पाहिजे, अशी मागणीही रणजित पाटील यांनी केली.