हिंगणघाटातील अंकिता जळीतकांडाचा निकाल आता नऊ फेब्रुवारीला; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती
हिंगणघाटातील अंकिता जळीतकांड प्रकरणात सरकारी पक्षातर्फे 29 साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालय या प्रकरणाचा निकाल देईल, असा विश्वास अॅड. उज्ज्वल निकम यांनी दिला. हा निकाल आता नऊ फेब्रुवारी रोजी लागणार आहे.
नागपूर : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील प्राध्यापिका अंकीता पिसूड्डे जळीतकांडाचा (Ankita Pisudde Jalitakanda) निकाल आज अपेक्षित होता. पण आता हा निकाल नऊ फेब्रुवारीला येणार, अशी माहिती सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम (Public Prosecutor Adv. Ujjwal Nikam) यांनी दिलीय. या खटल्यात परिस्थिती जन्य पुरावे मांडले, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं. हिंगणघाट येथील बहुचर्चित अंकिता जळीतकांड प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. या प्रकरणाचा निकाल नऊ फेब्रुवारीला लागणार आहे. प्रा.अंकिता जळीतकांड प्रकरणात सरकारी आणि आरोपी पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण (Argument complete) झालाय. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश भागवत यांच्यासमोर सरकारी पक्ष आणि बचाव पक्षातर्फे युक्तिवाद सुरू होता. तो 21 जानेवारीला पूर्ण झाला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे 29 साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालय या प्रकरणाचा निकाल देईल, असा विश्वास अॅड. उज्ज्वल निकम यांनी दिला.
घटनेला दोन वर्षे पूर्ण
प्रा. अंकिता पिसुड्डे हिचा दोन वर्षे पूर्वी दोन फेब्रुवारी 2020 ला निर्घृण हत्या करण्यात आली होती. 10 फेब्रुवारीला तिचा उपचारादरम्यान नागपूर येथील ऑरेंज सिटीमध्ये मृत्यू झाला. अंकिता जळीतकांड प्रकरणात पोलिसांनी आरोपी विक्की ऊर्फ विकेश नगराळे यांच्यावर भारतीय दंड विधानानुसार आरोपी निश्चित केले. या जळीत कांडाचे पडसाद संपूर्ण देशामध्ये उमटले. गुन्हेगारीला त्वरित फासावर द्या या मागणीसाठी मोर्चे व निदर्शने करण्यात आली. पीडित अंकिता व आरोपी हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावाचे रहिवासी आहेत. अंकिताचा मृतदेह ज्यावेळी दारोडा येथे अंत्यसंस्कारासाठी आणला होता. त्यावेळी संतप्त गावकर्यांनी रुग्णवाहिका व पोलिसांवर दगडफेक केली होती. शासनाला लोक आग्रहापुढे झुकून सदर प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयामध्ये होईल असे घोषित केले. विशेष सरकारी वकील म्हणून शासनातर्फे अधिवक्ता अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती याप्रकरणी करण्यात आली. त्यामुळे प्रकरणाची जलद चौकशी करण्यात आली. यावेळी सरकारी पक्षातर्फे अॅड. उज्ज्वल निकम, अॅड. दीपक वैद्य यांनी भाग घेतला. बचाव पक्षातर्फे अॅड. भूपेंद्र सोने, शुभांगी कोसार, अवंती सोने व सुदीप मेश्राम यांनी सहकार्य केले.