Nagpur Ganesh Utsav : चार फुटांवरील मूर्तींचे विसर्जन कोराडी तलाव परिसरात होणार, मनपाने केली विसर्जनासाठी व्यवस्था
चार फुटापर्यंतच्या उंचीच्या मूर्ती विसर्जनासाठी मनपाद्वारे शहरातील विविध भागात कृत्रिम कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात प्रभागनिहाय एकूण 387 विसर्जन कुंडांची व्यवस्था मनपाद्वारे करण्यात आलेली आहे.
नागपूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नागपूर शहरातील तलावात मूर्ती विसर्जनास बंदी आहे. परंतु, मनपाद्वारे चार फुटांवरील मूर्तींच्या विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोराडी येथील तलाव (Koradi Lake) परिसरात असलेल्या मोठ्या कृत्रिम विसर्जन कुंडामध्ये मनपाद्वारे विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या विसर्जनस्थळाची गुरुवारी मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर (Dr. Vipin Itankar) यांनी पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) विजय मगर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक व उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले आदी उपस्थित होते.
शहरात 387 विसर्जन कुंड
यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त करण्यात आलेला आहे. मात्र पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही नागपूर महापालिकेतर्फे शहरातील सर्व तलावांमध्ये मूर्ती विसर्जनास बंदी करण्यात आली आहे. चार फुटापर्यंतच्या उंचीच्या मूर्ती विसर्जनासाठी मनपाद्वारे शहरातील विविध भागात कृत्रिम कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात प्रभागनिहाय एकूण 387 विसर्जन कुंडांची व्यवस्था मनपाद्वारे करण्यात आलेली आहे. मात्र या कुंडांमध्ये केवळ 4 फुटापर्यंतच्याच मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे.
क्रेन आणि बॅरिकेट्सची व्यवस्था
चार फुटापेक्षा मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी आता मनपाद्वारे कोराडी तलाव परिसरात असलेल्या मोठ्या सिमेंटच्या हौदामध्ये विसर्जनाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासाठी क्रेन आणि बॅरीकेडसची व्यवस्था मनपातर्फे करण्याचे निर्देश डॉ. इटणकर यांनी दिले. विसर्जनस्थळाची पाहणी करून मनपा आयुक्तांनी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाला आवश्यक ते निर्देश दिले. यासाठी मनपाद्वारे आवश्यक ती व्यवस्था करण्याबाबतही त्यांनी निर्देशित केले आहे.