कोरोनाने हातपाय पसरले! नागपुरात गेल्या चोवीस तासांत 5 बळी, कोरोनाबाधित तीन हजारांवर
नागपूर जिल्ह्यात कोरोना विषाणू चांगलेच हातपाय पसरतोय. गेल्या चोवीस तासांत पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 296 झाली. त्यामुळं आरोग्य विभागाची चिंता आणखीणच वाढली आहे.
नागपूर : गेल्या वीस दिवसांहून अधिक कालावधीपासून जिल्ह्यात सलग बाधितांची संख्या ही कोरोनामुक्तांहून अधिक तर कधी दुप्पट नोंदविल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाच्याही चिंता वाढल्या आहेत. अधिकाधिक कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून चाचण्यांवर भर दिल्या जात आहे. त्यामुळेच जिल्ह्यात दिवसाआड चाचण्यांच्याही संख्येत वाढ होत आहे. बुधवारला शहरात 9 हजार 655 व ग्रामीणमध्ये 2 हजार 934 अशा जिल्ह्यात 12 हजार 589 चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी तब्बल 26.19 टक्के म्हणजेच 3 हजार 296 जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. यामध्ये शहरातील 2 हजार 676, ग्रामीणचे 529 व जिल्ह्याबाहेरील 91 जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या दहा हजारांवर
विशेष म्हणजे जिल्ह्यात ऑक्टोबरनंतर बुधवारला उच्चांकी पाच कोरोनाबळींच्या मृत्यूचीही नोंद झाली. त्यामुळं प्रशासन सतर्क झाले आहे. बुधवारला शहरातील 4 व जिल्ह्याबाहेरील 1 अशा पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यासोबतच एकूण कोरोनाबळींची संख्या 10 हजार 141 वर पोहचली आहे. बुधवारला शहरातील 1 हजार 54, ग्रामीणमधील 236 व जिल्ह्याबाहेरील 55 असे 1345 जण ठणठणीत होऊन घरी परतलेत. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या 4 लाख 90 हजार 843 वर गेली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मागील वीस दिवसांमध्ये 97.93 टक्क्यांवरुन 3.03 टक्क्याने घटून 94.90 टक्क्यांवर घसरले आहेत.
जिल्ह्यात सोळा हजारांवर सक्रिय रुग्ण
जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सक्रिय रुग्णांचीही संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येने सोळा हजारापलीकडचा टप्पा गाठला आहे. शहरात 13 हजार 133, ग्रामीणमध्ये 2939 व जिल्ह्याबाहेरील 170 असे जिल्ह्यात 16 हजार 242 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी लक्षणे नसलेले सुमारे बारा हजारांहून अधिक रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. तर मध्यम, तीव्र व गंभीर अशी लक्षणे असलेले रुग्ण मेयो, मेडिकल, एम्ससह इतर शासकीय व खासगी रुग्णालये तसेच संस्थात्मक विलगीकरणात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.