जेव्हा पोपटाला वाचविण्यासाठी स्पेशल मेट्रो चालविण्यात आली, चिमुकल्या जीवासाठी यंत्रणा हलली
मकर संक्राती संपून महिना झाला तरी जागोजागी अडकलेल्या मांज्याने पक्ष्याचे जीव जात आहेत..नागपूरात मांज्यात अडकलेल्या पोपटाला वाचविण्यासाठी पक्षीप्रेमी तरुण आणि नागपूर मेट्रो प्रशासनाने प्रयत्नाची शर्थ केली. अखेर या पोपटाची सुखरुपपणे सुटका झाली. परंतू इतिहासात प्रथमच एका पोपटासाठी मेट्रो चालविण्यात आली.
गजानन उमाटे, नागपूर | 14 फेब्रुवारी 2024 : मकर संक्रातीचा सण संपला तरी जागोजागी झाडांवर आणि इतर खांबावर मांजा अडकल्याने चिमुकल्या पक्ष्यांचे जीव जात आहेत. मकर संक्रातील नागपूरात पंतगोत्सवाचा जोर यंदाही मोठा होता. नायलॉन आणि चायनीज धारदार मांज्याने अजूनही देशात दुचाकीस्वारांचे प्राण जात असतात. मकरसंक्रात संपून एक महिना होत आला तरी जागोजागी अडकलेल्या मांज्याने अनेक पक्ष्यांनाही नाहक आपले प्राण गमवावे लागतात. अशा एका पोपटाला जीवनदान देण्यासाठी नागपूर मेट्रोने विशेष ट्रेन चालविण्याचा आर्श्चयचकीत करणारा प्रकार घडला आहे.
नागपूर मेट्रोच्या पिलरवर मंगळवारी एक पोपट अडकला होता. या पोपटाचा प्राण वाचविण्यासाठी स्पेशल मेटो चालविण्यात आली. मेट्रोच्या ट्रॅकवर चालत जाऊन मांजात पाय गुंतलेल्या या पोपटाला एका पक्षी प्रेमी तरुणाच्या मदतीने कर्मचाऱ्यांनी वाचविले. या मांज्याने जखमी झालेल्या पोपटावर ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात उपचार सुरू आहेत. सेमिनरी हिल्सवरील वनखात्याच्या ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या चमूने या पोपटाला जीवदान दिल्याने त्यांचे कौतूक होत आहे. पोपट अडकल्याची माहीती पक्षी प्रेमींनी फोन करून मेट्रो प्रशासनाला दिली. त्यानंतर मेट्रो कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला. त्यानंतर मेट्रोचे संचलन थांबवून मांज्यात अडकलेल्या पोपटाला वाचविण्याचे ऑपरेशन सुरु करण्यात आले असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मेट्रोची भूतदया…
गड्डीगोदाम भागातील मेट्रोच्या एका पुलावरील सुरक्षा कठड्यात मांज्यात एक पोपट अडकला होता. यासंदर्भातील माहीती रेस्क्यू टीमला देण्यात आली. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली होती. परंतू रेस्क्यू टीमला तेथपर्यंत पोहचता येत नव्हते. सर्व प्रयत्न केल्यानंतरही तेथे पोहचणे शक्य नसल्याचे ध्यानी आले. अखेर एका तरुणाने गड्डीगोदाम मेट्रो स्टेशन गाठले. तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर स्टेशनपासून 100 मीटर मेट्रोने तेथे जायचे ठरले. अधिकाऱ्यांनी अखेर या तरुणासाठी मेट्रोने 100 मीटर अंतर कापून तेथपर्यंत पोहचविण्यासाठी तयारी दर्शविली. हरीश किनकर आणि एक मेट्रो कर्मचारी मेट्रोत बसून विशेष फेरी चालविण्यात आली. 100 मीटर मेट्रो गेल्यानंतर मेट्रोतून उतरून या पुलावरील सुरक्षा कठड्यात मांज्यात अडकलेल्या पोपटाला या हरीश किनकर या तरुणाने वाचविले. मेट्रोच्या इतिहासात प्रथमच एका पोपटाला वाचविण्यासाठी मेट्रो धावली असेल.