नागपूर : जगण्यासाठी काय हवं? शुद्ध हवा, पाणी, अन्न… पण, हे सारं दूषित झालं असेल तर..? हे राम, जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही, असाच सवाल खापरखेडा, कोराडी प्रकल्प परिसरातले नागरिक विचारताहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 19 नोव्हेंबर रोजी चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी ते म्हणाले, एकाच ठिकाणी वीज प्रकल्प नकोत. त्यामुळं पर्यावरणाचे प्रश्न तयार होतात. याची प्रचिती आपल्याला कोराडी, खापरखेडा परिसरात येते. या परिसरात हवा, पाणी, माती, त्यामधून उत्पन्न होणारे अन्न हे दूषित झालेत. परिसरातल्या 18 गावांवर त्याचा विपरीत परिणाम होतोय. चला तर मग बघुयात नेमकं काय झालंय, या गावांमध्ये.
1) सुभाष भोयर हे खसाळ्याचे शेतकरी. गेल्या चार पिढ्यांपासूनची त्यांची जमीन आहे. याच जमिनीनं त्यांच्या चार पिढ्या पोसल्या. पण, आता इथं वीज प्रकल्प सुरू झाला. तेव्हापासून जमिनीची पोत बिघडली. एक हजार रुपये शेतात लावल्यानंतर 100 रुपयांचंही उत्पन्न येत नव्हतं. त्यामुळं शेती करणं बंद करावं लागलं.
2) वारेगावच्या शालू भारकर आधी बोअरवेलचे पाणी पीत होत्या. पण, प्रकल्पांमुळं पाणी दूषित झालं. पोटाचे त्रास वाढले. रुग्णालयात औषधोपचाराचा खर्च परवडेना. त्यामुळं पिण्याचं पाणी खरेदी करावं लागते. महिन्याला 500 रुपये पिण्याच्या पाण्यासाठी मोजावे लागतात.
3) कवठ्याचे सरपंच शरद माकडे म्हणाले, आम्ही अप्रत्यक्षरित्या राख खात आहोत. त्यामुळं आजाराचं प्रमाण वाढलं. श्वास घेण्याचा त्रास बहुतेकांना आहे. डोळ्यांना आग होते. या परिसरात चांगलं रुग्णालय असणं गरजेच आहे. पण, आमच्या मागण्यांकडं नेहमी दुर्लक्ष केलं गेलंय.
4) खैरीचे सरपंच मोरेश्वर कापसे यांनी सांगितलं की, वीज प्रकल्प प्रशासनानं या भागातील विहिरींचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे. शुद्ध पाणी नागरिकांना मोफत पुरविण्याची व्यवस्था केली पाहिजे. यासाठी शेतकरी आंदोलनासारखं आंदोलन करावं लागेल. त्याशिवाय हे प्रशासन वाकणार नाही.
यासंदर्भात नागपूरच्या सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (सीएफएसडी-Center for Sustainable Development), पुण्याच्या मंथन अध्ययन केंद्र आणि असर सोशल इम्पॅक्ट अॅडव्हायजर्स प्रा. लि. (Asar Social Impact Advisors Pvt. Ltd.)यांनी स्थानिकांच्या सहभागातून अभ्यास केलाय. त्यातून हे निष्कर्ष समोर आलेत.
कोराडी आणि खापरखेडा विद्युतनिर्मिती प्रकल्पातीत सांडपाणी कोलार आणि कन्हान नदीमध्ये थेट सोडले जात आहे. हे सांडपाणी फ्लाय अॅश मिश्रित आहे. अभ्यासादरम्यान अशी सहा ठिकाणे आढळली असून त्यांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. ब्युरो ऑफ स्टॅण्डर्ड्सनं पिण्याच्या पाण्यासाठी आखलेले निकष पूर्ण करण्यात हे पाणी अपयशी ठरले आहेत. वॉटर एटीएममधून मिळालेल्या पाण्याचे नमुने हेच फक्त त्यासाठी अपवाद ठरले आहेत. पाण्याच्या कित्येक नमुन्यांत मर्क्युरी, अर्सेनिक, लिथिअम, अॅल्युमिनिअम आदी विषारी घटकांचे प्रमाण सुरक्षित पातळीच्या 10 ते 15 पटीने अधिक असल्याचे अभ्यासामध्ये आढळून आले. मानवासाठी ज्ञात विषारी घटकांमध्ये मर्क्युरी हा सर्वाधिक विषारी आहे. आर्सेनिकचा संबंध लिव्हर आणि ब्लडच्या कॅन्सरशी आहे. भूपृष्ठावरील पाणी आणि भूजल दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणात गढूळपणा, जडपणा, क्षारता आणि डिसॉवल्ड सॉलिड्स यांचं अस्तित्व अधिक पातळीत दिसलं. त्याचबरोबर अॅन्टीमॉनी, अॅल्युमिनिअम, आर्सेनिक, बोरोन, फ्लुरॉईड, आयर्न, मँगनिज, मॅग्नेशिअम, मर्क्युरी, मॉलिबडेनम, लिथिअम, लेड आणि सेलेनिअम यांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आढळलं. आर्सेनिक, कॅडमिअम, क्रोमिअम, लेड, मँगनीज, मर्क्युरी, सेलेनिअम, कोबाल्ट, कॉपर, निकेल, झिंक, फ्लुरॉईड आणि तेल व ग्रीस असे अनेक प्रदूषक घटक दोन्ही विद्युत निर्मिती केंद्राच्या फ्लाय अॅशमध्ये दिसून आलेत. फ्लाय अॅश मिश्रित हवा श्वसनाद्वारे ताबडतोब फुफ्फुसापर्यंत पोहचते. त्यावेळी एकीकडे फ्लाय अॅश हे पार्टिक्यूलेट मॅटर (बारीक कणांच्या स्वरुपात प्रदूषण) असल्याने त्रास होतो आणि त्यातील जड धातूदेखील थेट फुफ्फुसात जातात. जेव्हा फ्लाय अॅश पाण्यात मिसळते तेव्हा हेच जड धातू पाण्यात विरघळतात. अशा प्रकारचे भूपृष्ठावरील आणि जमिनीखालील पाणी स्थानिकांकडून अनेक कारणांसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. हे पाणी पिण्यासाठी, आंघोळ आणि कपडे धुण्यासाठी, इतर घरगुती उपयोग, मासेमारी, सिंचन आणि गाई-गुरांसाठी वापरले जाते. या सर्वाचे अत्यंत गंभीर परिणाम येथील लोकांवर आरोग्यावर आणि जीवनमानावर होत आहेत. कारण हे प्रदूषक घटक मानवावर आणि जनावरांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करणारे म्हणून ओळखले जातात.
फ्लाय अॅश त्यांच्या शेतजमिनीवर आणि पिकांवर साचते. त्यामुळं पिकांची वाढ, पीक उत्पन्नात घट, जनावरांवर परिणाम आणि दुग्धोत्पादन आदींवर परिणाम होतोय. सर्वेक्षण केलेल्या अनेक गावातून, ब्रॉन्कायटिस आणि अस्थमा असे श्वसनाचे विकार, खोकला सर्दी, घशाला संसर्ग, डोळे चुरचुरणे आणि डोळ्यांना संसर्ग, त्वचारोग, हाडाच्या सांगाड्यांवर परिणाम अशा आरोग्य तक्रारींची नोंद झालीय. गुरा-ढोरांच्या हाडांच्या सांगड्यावर याचा प्रभाव दिसत आहे. हे सर्व आजार अभ्यासात सापडलेल्या दूषित घटकांशी निगडीत आहे. या गावांव्यतिरिक्त फ्लाय अॅश साचून राहिल्याने होणारे परिणाम नागपूर शहराच्या बाहेरील भागातदेखील झाले आहेत. महानिर्मिती आणि इतर नियंत्रक यंत्रणा हे प्रदूषण नियंत्रित करण्यात सपशेल अपयशी तर ठरले आहेत. पण स्थानिकांनी वारंवार या प्रश्नांवर आवाज उठविला असताना आणि यंत्रणांकडे निवेदन दिले असतानादेखील त्यांबाबत पूर्णपणे उदासीनताच दाखवली आहे. इतकेच नाही तर सरपंचांसारख्या लोकप्रतिनिधींनी पाठवलेल्या पत्रांनादेखील उत्तर मिळालेलं नाही.
महानिर्मितीनं तातडीने पावले उचलून हे सर्व प्रदूषण निश्चित कालमर्यादेमध्ये पूर्णपणे थांबवावे. विशेषत: पाण्याच्या स्थानिक स्रोतांमध्ये फ्लाय अॅशचा विसर्ग करणे आणि धूळ आणि पार्टिकल्सच्या स्वरुपात फ्लाय अॅशचे पसरणे थांबवावे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरण बदल मंत्रालयाने या कालबद्ध उपाययोजनांवर निगराणी ठेवण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करावी. प्रदूषणाचे प्रमाण तसेच राहिल्यास प्रश्न सुटेपर्यंत विद्युत निर्मिती प्रकल्पाचे कामकाज थांबविण्यासारखे कठोर आणि जलद निर्णय घ्यावे. या कामाची प्रगती नागरिकांच्या दृष्टिकोनातून होत आहे का यावर लक्ष ठेवण्यासाठी परिसरातील गावांचे प्रतिनिधी-सरपंच, यासोबत नागरी संस्थांचे प्रतिनिधी आणि या विषयातील स्वतंत्र तज्ज्ञ यांची एक समिती स्थापन करावी. महानिर्मिती कंपनीने प्रदूषण ताबडतोब थांबविण्याबरोबरच यापूर्वी प्रदूषित झालेल्या सर्व भागांतील प्रदूषण दूर करणे बंधनकारक आहे.
अॅन्टीमॉनीचे पिण्याच्या पाण्यातील प्रमाण जास्त असल्यास उलट्या होणे आणि हगवण यासारख्या आजार होतात. आर्सेनिक हा मानवी शरीरासाठी विषारी घटक आहे. मॉलिबडेनम खाणीचे काम जवळच सुरू असल्यास त्याचे पाण्यातील प्रमाण हे 200 मायक्रोग्रॅम प्रतिलिटरपर्यंत जास्त असू शकते. अॅल्युमिनिअम, बोरोन, फ्लुरॉईड, मॅग्नेशिअम आणि लेड यांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात असलेले पाणी वापरल्यास कर्करोग, श्वसनासंबंधी विकार, मेंदूशी निगडीत आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित गंभीर आरोग्य समस्यांचे कारण ठरतात.
– डॉ. समीर अर्बट, इंटरव्हेन्शनल पल्मोनोलॉजिस्ट, वन हेल्थकेअर इंडिया
फ्लाय अॅश आणि दूषित पाणी यामुळं स्थानिकांना श्वसनासंबंधी, त्वचा, डोळे आणि पोटाच्या विकाराचे त्रास सहन करावे लागतात. फ्लाय अॅशमुळे दम्याचा त्रास वाढलेला आहे. तसेच डोळ्यात जळजळ होणे, डोळ्यांतून पाणी येणे, त्वचा कोरडी पडणे, त्वचेला खाज येणे अशा तक्रारींचे प्रमाण वाढलेले आहे. पाणीदेखील दूषित झाल्याने पोटाचे आजारदेखील दिसून येतात. विशेष म्हणजे हे सर्व आजार हे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांमध्ये दिसून येत आहेत.
– डॉ. निखिल भुरे, खसाळा
फ्लाय अॅश हवेत पसरत असल्याने रहिवाशांना दम्याचा त्रास होतो. तसेच त्वचेला खाज सुटणे, डोळे जळजळणे अशा त्रासाला याच काळात तोंड द्यावे लागते. रहिवाशांना अनेक वर्षांपासून हा त्रास येथील सोसावा लागतो.
– डॉ. सी. पी. शर्मा, खसाळा