Nagpur | विश्वशांतीसाठी वैदर्भीय कला अकादमीचा पुढाकार, हरिहर पेंदे यांनी रेखाटले चित्र, चित्रात नेमकं काय?
या आक्रमणामुळे ही शांतीदूत कबुतराची प्रतिमाच रक्तरंजित झाल्याचे चित्रात आपल्याला दिसते. कलेच्या माध्यमांतून शांतता प्रस्थापित करू शकणाऱ्या सर्व शक्तींना या चित्राने एक आवाहन, अहिंसेच्या पुजाऱ्याच्या पायथ्याशी बसून केले आहे.
नागपूर : वैदर्भीय कला अकादमी (Vaidyarvi Academy of Arts) ही संस्था गेल्या तीस वर्षांपासून नागपूरच्या कलाक्षेत्रात कार्यरत आहे. सामाजिक बांधीलकी जपणारी कलाभिव्यक्ती हे वैदर्भीय कला अकादमीचे वैशिष्ट्य. आजवर वैदर्भीय कला अकादमीतर्फे सामाजिक महत्त्वाच्या विषयांवर चित्रे रेखाटली गेली आहेत. सध्या युक्रेन आणि रशिया (Ukraine and Russia) या दोन देशांमधले युद्ध हा जगात चर्चेचा विषय आहे. या दोन देशांमधले हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरू शकते, असे काही जाणकारांचे मत आहे. युद्ध हा कुठल्याही संघर्षाचा पर्याय असूच शकत नाही. हे मानणाऱ्या कलाचिंतकांचं प्रतिनिधित्त्व, वैदर्भीय कला अकादमी करते. आपल्या आजवरच्या लौकिकाला साजेसे एक चित्र वैदर्भीय कला अकादमीचे सुप्रसिद्ध चित्रकार हरिहर पेंदे (well known painter Harihar Pende) यांनी काल सीताबर्डीवरील गांधी पुतळ्याच्या पायथ्याशी भव्य कॅनव्हासवर रेखाटले आहे. विशेष म्हणजे ज्या महात्मा गांधींनी जगाला अहिंसेची शिकवण दिली त्यांच्या पुतळ्याच्या सावलीत हे युद्धविरोधी चित्र रेखाटले गेले.
सत्ताधिशांच्या बोलण्या-वागण्यातील विसंगती
हरिहर पेंदे यांनी रेखाटलेल्या या चित्राचा विषय नो वार अर्थात विश्वशांती असा आहे. हे चित्र रेखाटण्यामागची त्यांची प्रेरणा विशद करताना चित्रकार हरिहर पेंदे म्हणाले, जगाच्या आरंभापासूनच या जगावर वेगवेगळ्या काळात विविध युद्धे लादली गेली आहेत. परंतु ही युद्धे जगावर लादणारी माणसे नेहमीच शांततेच्या बाजूने बोलत राहिलेली आहेत. एकीकडे शांततेची पैरवी करताना आपल्या सत्तेचा विस्तार करणे हे या तथाकथित शांतिदूतांचे लक्ष्य राहिलेले आहे. जागतिक सत्ताधिशांच्या वागण्यातील आणि बोलण्यातील हा अंतर्विरोध अधोरेखित करणे, त्यातील विसंगती निदर्शनाला आणून देणे, हे या भव्य कॅनव्हासवर रेखाटलेल्या जाहीर चित्राचे उद्दिष्ट आहे.
कबुतरे झाली मिसाईलवाहक
या चित्रात शांतीचा संदेश देणारी अनेक पांढरी कबुतरे एका विशालकाय कबुतराच्या पंखावर चित्रित केलेली आहेत. ही शांतीची पैरवी करणारी कबुतरेच मिसाईलवाहक झालेली आपल्याला चित्रात दिसतात. एकीकडे हिंसेचे उघड समर्थन करणाऱ्या सत्तांध शक्ती आणि दुसरीकडे शांततेच्या बाजूने लढणाऱ्या हिंसक प्रवृत्ती यांच्यावर भेदक भाष्य करणारे हे चित्र आहे. जगात खरी शांतता नांदावी असे वाटत असेल तर प्रतिमांमध्ये बद्ध झालेल्या आजवरच्या आकलनाची आपल्याला मोडतोड करावी लागेल असा संदेश हे चित्र देते. कबुतराची प्रतिमा या चित्रात हिंसेला प्रत्युत्तर म्हणून हिंसाच आचरताना दिसते. या आक्रमणामुळे ही शांतीदूत कबुतराची प्रतिमाच रक्तरंजित झाल्याचे चित्रात आपल्याला दिसते. कलेच्या माध्यमांतून शांतता प्रस्थापित करू शकणाऱ्या सर्व शक्तींना या चित्राने एक आवाहन, अहिंसेच्या पुजाऱ्याच्या पायथ्याशी बसून केले आहे.