Maratha Reservation : ‘जरांगे पाटील यांचं आम्हाला देणं घेणं नाही’, काँग्रेस नेत्याच वक्तव्य, VIDEO
Maratha Reservation : "राज्य कोणाला लुटवायच असेल तर लुटवून टाका. पण कुणी आमच्या कुणबी समाजाच्या अस्मितेला हात लावायचा प्रयत्न केला, तर फार मोठं भयंकर उत्तर देऊ" असा हा काँग्रेस नेता म्हणाला.
नागपूर : मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 12 वा दिवस आहे. मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र द्याव, त्या माध्यमातून आरक्षणाची मागणी पूर्ण करावी, अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. पण अजून यावर कुठलाही तोडगा निघालेला नाही. काल मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक झाली. त्यानंतर सरकारच्यावतीने अर्जुन खोतकर एक बंद लिफाफा घेऊन येणार आहेत. हा लिफाफा जरांगे पाटील यांना देण्यात येईल. दरम्यान मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीमुळे ओबीसी समाजातील नेते आक्रमक होत चालले आहेत. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठी समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केल्यामुळे सुनील केदार आक्रमक झाले आहेत. “मागच्या आठ-पंधरा दिवसापासून महाराष्ट्रात वेगवेगळे विषय सुरु आहेत. त्याला धरुन विशेषत: कुणबी समाजाबद्दल जो उल्लेख होतोय, कुणबी समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या विषयमामध्ये कुणी ढवळाढवळ केली, तर मान्य करणार नाही. कोणाचा किती जरी प्रयत्न असला, तरी हाणून पाडू. राज्य कोणाला लुटवायच असेल तर लुटवून टाका. पण कुणी आमच्या कुणबी समाजाच्या अस्मितेला हात लावायचा प्रयत्न केला, तर फार मोठं भयंकर उत्तर देऊ” असा सुनील केदार म्हणाले. ‘आमची जमिनीवरची ताकद कुणी पाहिली नाही, ती दाखवून देऊ’
“आमच्या कुणबी समाजाच्या विषयी कुणी राजकारण करत असेल, तर ते हाणून पाडू. पुढे कोणी हिम्मत करणार नाही, जरांगे पाटील यांचं आम्हाला देणं घेणं नाही, आम्हाला आमचं देणं घेणं आहे राज्य कर्त्यांकडून” असं सुनील केदार म्हणाले. “आमच्या अस्मितेला कुणी हात लावला, तर आंदोलनापुढची भूमिका घेऊ. रस्त्यावर उतरू. आमची जमिनीवरची ताकद कुणी पाहिली नाही, ती दाखवून देऊ” असं सुनील केदार म्हणाले.