Nagpur | कळमेश्वर सिटी सर्व्हे घोटाळा प्रकरण, महसूल मंत्री Balasaheb Thorat यांचे पुनर्तपासणीचे आदेश
नागपूरसह राज्यातील 61 नगर परिषदांचे सिटी सर्व्हे करण्यात आले. यात कळमेश्वर ब्राम्हणी नगर परिषदेचाही समावेश आहे. परंतु नगरपरिषदेला विश्वासात न घेता नगर भूमापन व भूमी अभिलेख कार्यालयाने खाजगी संस्थेव्दारे सर्व्हे केल्याची तक्रार स्थानिकांची होती.
नागपूर : नगर भूमापनद्वारे कळमेश्वर-ब्राह्मणी (Kalmeshwar-Brahmani) शहरात 2012-13 सालातील सिटी सर्व्हेत घोटाळा (City Survey Scam) झाल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती. याप्रकरणी कळमेश्वर येथील उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने घेतलेल्या शिबिरात 90 अर्ज प्राप्त झालेत. त्यांच्या पुनर्तपासणीचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी दिली आहे. सन 2012-13 साली नागपूरसह राज्यातील 61 नगर परिषदांचे सिटी सर्व्हे करण्यात आले. यात कळमेश्वर ब्राम्हणी नगर परिषदेचाही समावेश आहे. परंतु नगरपरिषदेला विश्वासात न घेता नगर भूमापन व भूमी अभिलेख कार्यालयाने खाजगी संस्थेव्दारे सर्व्हे केल्याची तक्रार स्थानिकांची होती.
अत्यंत चुकीच्या पद्धतीने सर्व्हे
महत्त्वाचे म्हणजे सर्व्हे करणाऱ्या खाजगी संस्थेने कागदपत्रांची पूर्तता व दस्तऐवजांची शहानिशा न करता अत्यंत चुकीचा सर्व्हे केला. मालमत्तांच्या नोंदणी चुकीच्या आणि आखीव पत्रिकेत मोठा घोळ असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. या प्रकरणातील तथ्य जाणून घेण्याचा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रयत्न केला.
तीन महिन्यांत कार्यवाही करणार
यावेळी, सन 2012-13 साली राज्याच्या 61 नगर परिषदांमध्ये झालेल्या सिटी सर्व्हेत कळमेश्वर-ब्राह्मणी शहराचा समावेश आहे. येथे 5 हजार 420 मालमत्तांचे भूमापन झाले असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली. कंत्राट देण्यात आलेल्या खाजगी कंपनीने 1 ऑगस्ट 2013 रोजी भूमापन पूर्ण केले. हे काम करण्यापूर्वी मालमत्ता धारकांना नोटीस देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. तरीही नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता शिबिराच्या माध्यमातून आलेल्या अर्जदारांच्या मालमत्तांचे कागदपत्रे तपासून तीन महिन्यात कार्यवाही करणार असल्याचे यावेळी बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.