Tadoba tiger | सरत्या वर्षाने घेतला देशात 126 वाघांचा बळी; ताडोबात वाघोबाला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
ताडोबातील उत्तम व्याघ्र संख्या व संवर्धन योजनांमुळे ताडोबा पर्यटनाला प्रथम पसंती मिळते आहे, अशी माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली.
चंद्रपूर : देशात सरत्या वर्षात 126 वाघांचा बळी गेलाय. त्यापैकी 60 वाघ हे मानव-प्राणी संघर्षाला बळी पडलेत. हा संघर्ष काही संपेल, असं वाटतं नाही. पण, जंगलाचा राजा जगला पाहिजे. तो दिसला पाहिजे म्हणून त्याला पाहणारेही काही कमी नाहीत. म्हणूनच सरते वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी ताडोबा अभयारण्यात पर्यटकांनी गर्दी केली आहे.
2021 या सरत्या वर्षात देशभरात एकूण 126 वाघांचा मृत्यू झाला. वाघांच्या मृत्यू ही संख्या गेल्या एका दशकातील सर्वाधिक आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) कडून या वर्षी 29 डिसेंबरपर्यंतची आकडेवारी जाहीर करण्यात आली. यात 126 मोठ्या वाघांपैकी 60 वाघ हे शिकार, अपघात आणि संरक्षित क्षेत्राबाहेर मानव-प्राणी संघर्षाला बळी पडले आहेत. 2018 च्या जनगणनेनुसार, भारतात 2,967 वाघ होते. एनटीसीएने 2012 पासून सार्वजनिकरित्या वाघांच्या मृत्यूची नोंद ठेवली आहे. यावर्षी वाघांच्या मृत्यूची संख्या दशकातील सर्वाधिक असू शकते, अशी शक्यता मध्यंतरी वर्तवण्यात आली होती. याचे कारण म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत तब्बल 99 वाघांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी 2016 मध्ये सर्वाधिक वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तेव्हा ती संख्या 121 वर होती.
राज्यात 26 पैकी 15 वाघांचा नैसर्गिक मृत्यू
महाराष्ट्रात या काळात 26 वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. या 26 वाघांपैकी सर्वाधिक 15 वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झालाय तर विषबाधा, शिकार, रेल्वे अपघात, वीज प्रवाहाचा स्पर्श ही कारणे देखील यात समाविष्ट आहेत, अशी माहिती वन्यजीव अभ्यासक बंडू धोतरे यांनी दिली.
व्याघ्रदर्शनासाठी 16 प्रवेशद्वारातून प्रवेश
चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात नववर्षानिमित्त पर्यटकांची गर्दी बघायला मिळत आहे. 1 ऑक्टोबर 2021 पासून ताडोबातील पर्यटन हंगाम कोरोना काळानंतर सुरू झालाय. कोअर आणि बफर क्षेत्रातील 16 प्रवेशद्वारातून कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन करून पर्यटकांनी पट्टेदार वाघाच्या दर्शनासाठी उत्सुकता दाखवली आहे. मागील तीन महिन्यांच्या काळात सुमारे 90 हजार पर्यटकांनी ताडोबात हजेरी लावली आहे. सुमारे दीड वर्षे कोरोनाच्या कठीण काळानंतर पर्यटनाला चालना मिळाली आहे. ताडोबातील उत्तम व्याघ्र संख्या व संवर्धन योजनांमुळे ताडोबा पर्यटनाला प्रथम पसंती मिळते आहे, अशी माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली.