Nagpur ZP | आरोग्य कर्मचारी नाही हे तर लोकसेवक; जि. प. सीईओंनी शोधलेले रोल मॉडल काय?
प्रसूतिपूर्व प्रसुतीपश्चात आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात देता आल्या. संगीता यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाची प्रतिमा या भागात उंचावली. संगीता आता अनेक घरातील महिलांची आरोग्यसखी झाली.
नागपूर : लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडविणाऱ्या जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) आरोग्य विभागातील (Health Department) सहा गुणवंत कर्मचाऱ्यांचे जाहीर कौतुक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी घडवून आणले. या सहा कर्मचाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे जनतेमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाची प्रतिमा सुधारली आहे. अन्य कर्मचाऱ्यांनी देखील हा कित्ता गिरवावा, असे आवाहन कुंभेजकर यांनी केले आहे. कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत शासकीय यंत्रणाच अग्रेसर होऊन काम करते. वेगळेपणाने काम करणाऱ्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सहा चेहऱ्यांनी या विभागाची प्रतिमा उंचावली आहे.
मुलांच्या लसींचा पाठपुरावा केला
कामठी – अनिता खंगारले या आशाताईने आपल्या सादरीकरणामध्ये कामठी तालुक्यातील गुमथी येथे अतिशय चोखपणे नियमित कामे पूर्ण केली. मात्र या महिलेने अधिनस्त येणाऱ्या लोकसंख्येमध्ये कोणते लोक सरकारी आरोग्य सेवेचा वापर करतात व कोणते लोक खासगी आरोग्य सेवेचा वापर करतात याची यादी तयार केली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेतील सर्व योजना गरिबापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. तर आरोग्य उपकेंद्रामध्ये हक्काने पोहोचणाऱ्यांची संख्या वाढली. उमरेड – तालुक्यात काम करणाऱ्या आरोग्यसेविका संगीता भुसारी या महिलेने स्वयंप्रेरणेने व स्वयंशिस्तीत लहान मुलांच्या जन्मानंतर लावण्यात येणाऱ्या लसीचा पाठपुरावा केला. त्यामुळे या परिसरात जन्मलेल्या प्रत्येक मुलाचे लसीकरण बिनचूक झाले. मुले सुरक्षित झाले. प्रसूतिपूर्व प्रसुतीपश्चात आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात देता आल्या. मात्र, संगीताच्या माध्यमातून आरोग्य विभागाची प्रतिमा या भागात उंचावली. संगीता आता अनेक घरातील महिलांची आरोग्यसखी झाली.
साथ रोगाची माहिती पोहोचविली
तारसा – विनोद लांगडे या तरुण आरोग्यसेवकाने तारसा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी नसताना स्वतः डाटा एंट्रीचे काम केले. परिस्थितीचा पाढा वाचत हे माझे काम नव्हे, म्हणून पाट्या टाकण्याऐवजी साथ रोगाची माहिती अचूक पोहोचवली. नियमित कामे पण योग्य प्रकारे केली. त्यामुळे या भागात आरोग्य सुविधा अधिक देता आल्या. श्रीमती गौमती किडावू या आरोग्य सहाय्यक असणाऱ्या गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला कर्मचाऱ्याने मिळालेल्या प्रशिक्षणाचा योग्य वापर केला. त्यामुळे प्रशिक्षण साहित्य पडून न राहता लोकांच्या कामी आले. वाढोणा उपकेंद्रांमध्ये डॉ. राजश्री राऊत यांनी तर खासगी हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या अनेक दुर्धर आजारावर स्वतः पुढाकार घेऊन आपल्याच आरोग्यकेंद्रात उपचार केले. त्यामुळे वाढोणा केंद्राचे महत्त्व वाढले. शासकीय सुविधा विनाखर्चाने शेकडो नागरिकांना मिळाल्या. उत्तम दर्जाचे वैद्यकीय उपचार केंद्रात होत असल्यामुळे नागरिकांचा कल या केंद्राकडे वाढला. अनेकांनी त्यांच्यामुळे झालेल्या वैद्यकीय मदतीमुळे लक्षावधी रुपये वाचल्याचे व्हिडिओ जारी केले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णसंख्या वाढली
गुमथळा – प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मोनिश तिवारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रावरच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने काय करायला पाहिजे याचा वस्तुपाठ पूर्ण जिल्ह्याला घालून दिला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे परिस्थिती नसतानादेखील खासगी रुग्णालयाकडे गरीब लोकांना धाव घ्यावी लागते. मुख्यालयी न राहणे हा सरकारी कर्मचाऱ्यांचा मोठा आजार. मात्र डॉक्टर तिवारी कायम मुख्यालयी राहतात. त्यामुळे या केंद्रात मोठ्या प्रमाणात उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली. गर्भवती महिला व त्यांच्यासाठी असणाऱ्या आरोग्य सुविधांचा लाभ अधिक याठिकाणी पोहोचतो. डॉक्टर स्वतः तपासणी करत असल्यामुळे या केंद्रावर आलेला रुग्ण अन्य ठिकाणी हलविला जात नाही. सुखरूप उपचार होऊनच घरी जातो. त्यामुळे या परिसरात आरोग्य यंत्रणेबद्दल अतिशय सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे.