नागपुरात इतक्या जनावरांमध्ये आढळली लम्पीची लक्षणं, लसीकरणासाठी मोहीम काय?
जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी घाबरून न जाता जनावरांना लक्षणे दिसल्यानंतर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. योग्य औषध उपचार केल्याने बाधित जनावरे दोन ते तीन आठवड्यात पूर्णपणे बरी होतात.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर आणि हिंगणामध्ये आतापर्यंत 20 जनावरांमध्ये लम्पीची लक्षण आढळली. त्यापैकी सावनेर मध्ये एका जनावरांचा मृत्यू झाला. सावनेरमध्ये 2 हजार 232, तर हिंगण्यामध्ये 1 हजार 400 लसी देण्यात आल्या. सध्या कंटेंटमेंट परिसरात लसीकरण केलं जातं आहे. आता 7 सॅम्पल तपासणीसाठी पाठविले आहेत. तालुका निहाय अधिकाऱ्यांचे मदतीसाठी नंबर दिले जाणार आहेत. आणखी लस येणार आहे. लसीचा कमतरता भासणार नाही. जनावराच्या बाजारावर बंदी करण्यात आले. त्या संदर्भात ऑर्डर काढले आहेत.
जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात
नागपूर जिल्ह्यात सावनेरनंतर हिंगणा तालुक्यात देखील लम्पीसदृश्य लक्षणे असणारी गुरे आढळली. नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. जिल्ह्यामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
गावामध्ये फवारणी
आज नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यामधील दोन बाधित गावे उमरी आणि बडेगाव येथे लसीकरणाची मोहीम सुरू झाली. पाच किलोमीटर अंतराच्या त्रिजेमध्ये असलेल्या सर्व गावांमध्ये लसीकरण राबविण्यात येणार आहे. आज सुमारे सहा गावांमध्ये एकूण 9 हजार 95 गोवंशीय पशुधनाला गोटफॉक्सची लस लावण्यात आली. तसेच गावामध्ये फवारणीचे कार्यक्रमही राबविण्यात आले.
आज हिंगणा तालुक्यातील जुनेवाडी गावामध्येसुद्धा दोन बाधित जनावरे आढळली. याठिकाणी पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येथील डॉक्टरांनी जाऊन नमुने गोळा करण्याची प्रक्रिया केली आहे. सदर नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात येतील.
13 गावांमध्ये लसीकरण
उद्यापासून सदर गावाच्या पाच किलोमीटरच्या त्रिज्जेमध्ये येणाऱ्या 13 गावांमध्ये लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. सुमारे 4 हजार 590 गोवंशीय जनावरांचे पशुधनाला मोफत गोट बॉक्स लसीकरण करण्यात येईल.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी घाबरून न जाता जनावरांना लक्षणे दिसल्यानंतर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. योग्य औषध उपचार केल्याने बाधित जनावरे दोन ते तीन आठवड्यात पूर्णपणे बरी होतात.
रोगाने बाधित जनावरांना तात्काळ निरोगी जनावरांपासून वेगळे बांधण्यात यावे आणि त्यांचा औषधोपचार जागीच करण्यात यावा.रोगाने बाधित झालेली जनावरे विकू नये अथवा त्यांची वाहतूक करू नये, असे आवाहनही पशुपालकांना करण्यात येत आहे.