बच्चू कडू यांच्यानंतर आता महायुतीला ‘या’ नेत्याचा ताप?; विधानसभेच्या 104 जागांवर दावा
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे महायुतीत खळबळ उडाली आहे. या निकालानंतर आता महायुतीतील छोट्या पक्षांनी डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीने या पक्षांना विचारात घेतलं नव्हतं. त्यामुळे नाराज असलेल्या या राजकीय पक्षांनी आता आपल्या मागण्या रेटण्यास सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते बच्चू कडू यांनी अमरावतीत उमेदवार देऊन महायुतीला धोबीपछाड केलं. महायुतीचा घटक पक्ष असूनही बच्चू कडू यांनी अमरावतीत महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव घडवून आणला. त्यामुळे महायुतीत एकच खळबळ उडाली आहे. छोट्या पक्षांना गृहित धरण्याचा किती मोठा फटका बसतो हे या निवडणुकीतून दिसून आलं आहे. बच्चू कडू यांनी दणका दिल्यानंतर आता महायुतीतील आणखी एका मित्रपक्षाने मोठी मागणी केली आहे. या नेत्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीने आम्हाला 104 जागा सोडायला हव्यात अशी मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीला बच्चू कडू यांच्यानंतर आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत जानकर महायुतीच्या तिकीटावर लढले होते. पण त्यांचा पराभव झाला. मात्र, पराभव झाला तरी जानकर यांच्या मतदानाचा टक्का वाढला आहे. यामुळे जानकर यांचा हुरूप वाढला आहे. त्यामुळेच जानकर यांनी विधानसभेच्या 288 जागांची तयारी सुरू केली आहे. मात्र, प्रत्यक्षात आपण 104 जागांची मागमी करू, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.
आम्ही 104 जागा मागणार आहोत. महायुतीत चर्चेला बसल्यावर काही जागा मागेपुढे होतील, असं सांगतानाच केवळ पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही आमची ताकद आहे. त्या ठिकाणीही आम्ही उमेदवार देणार आहोत. आम्ही आमची तयारी करत आहोत. ज्याची जितकी कुवत तेवढ्या जागा मिळतील. महायुतीतील वरिष्ठ नेते आमची दखल घेतीलच, असं जानकर यांनी स्पष्ट केलं.
राज्यसभेवर विचार होईल
विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आहेत. आता राज्यसभेसाठी माझा विचार होईल. महायुती माझी दखल होईल. चिंता करायचं कारण नाही, असं सांगतानाच राष्ट्रीय समाज पक्ष वाढवणं हेच आमचं काम आहे. त्यावर आमचा सर्व जोर आहे, असंही जानकर म्हणाले.
कंपन्यांवर कारवाई करू
अकोला जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना पिक विमा हा कमी प्रमाणात आलेला आहे. यासाठी काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. याबाबतही जानकर यांनी विचारण्यात आले. त्यावर, आमच्या वेळेस मी पीक विमा वाढून दिला होता. शेतकऱ्यांना कमी पीक विमा दिला जात असेल तर संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच त्यांनी दिला.