Manisha Kayande : मनीषा कायंदेनी घेतली बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट, पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाबद्दल व्यक्त केली चिंता
अमृता फडणवीस यांच्याबद्दल आम्ही काही बोलतच नाही. आम्ही सुसंस्कृत आहोत. काहीतरी उचलली जीभ आणि लावली टाळूला असं त्यांच काम आहे.
नागपूर : भंडारा – गोंदियातील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मेडिकल रुग्णालयात भेट घेतली. पीडितेवर नागपुरातील मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनीषा कायंदे म्हणाल्या, सामूहिक बलात्कार पीडितेला किंवा तिच्या नातेवाईकांना आम्ही भेटू नये अशा सूचना रुग्णालय प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या होत्या का अशी आम्हाला शंका वाटते. शिवसेनेतर्फे आम्हाला काही मदत निधी द्यायचे होती. तीसुद्धा आम्हाला पीडितेच्या कुटुंबीयांना देऊ दिली नाही. भंडारा जिल्ह्यात सहा दिवस पोलीस अधीक्षक नव्हते. आधीचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव (Vasant Jadhav) यांना शिंदे गटाचे स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांच्या दबावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी तिथून हटवले होते. नवीन पोलीस अधीक्षकांची नेमणूक होण्याच्या आधीच ही दुर्दैवी घटना घडली. कदाचित पोलीस अधीक्षक राहिले असते तर ही घटना अशा वळणावर गेली नसती. घटनेच्या तपासात दिरंगाई झाली नसती. जिल्ह्याला सहा दिवस पोलीस अधीक्षक नसणं ही गंभीर बाब आहे. संवेदनशील घटना घडल्यानंतर त्वरित पोलिसांकडून कारवाई होण्यासाठी पोलीस अधीक्षक असणे आवश्यक असते, असंही मनीषा कायंदे यांनी सांगितलं.
तुमची मैत्री तुमच्याजवळ ठेवा
शहाजी पाटीलांवरील प्रतिक्रिया देताना मनीषा कायंदे म्हणाल्या, ही पश्चात बुद्धी कशासाठी. मंत्रिमंडळाची आशा धूसर पडत आहे का ? आधी वाटेल तसे आरोप केले. मातोश्रीवर आरोप केले. उद्धवजींवर आरोप केले. आता मैत्री दिनाच्या शुभेच्छा सुचते का? तुमची मैत्री तुमच्याजवळच ठेवा दहा पक्ष फिरून आलेल्यांनी आम्हाला मैत्री शिकवू नये.
फडणवीस आधी मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री
नितेश राणे यांच्याबद्दल मनीषा कायंदे म्हणाल्या, कोणी कोणाच्या गाडीवर ड्रायव्हर राहावं हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही आता त्या पक्षाचे प्रवक्ते झाले आहे. त्यांच्या गटात गेले आहे. आता तुमची काय अवस्था होते ते बघा तुम्ही. अमृता फडणवीस यांच्याबद्दल आम्ही काही बोलतच नाही. आम्ही सुसंस्कृत आहोत. काहीतरी उचलली जीभ आणि लावली टाळूला असं त्यांच काम आहे. त्यांना कुठलं तरी गाणं सुचलं. तेच गाणं मला देवेंद्र फडणवीसांबद्दल सुचविते. त्यांच्या नशिबात काय आहे ते मुख्यमंत्री होते. आता ते उपमुख्यमंत्री आहेत, ही वेळ आली. त्यामुळे काय जास्त बोलायचं, असा खोचट टोला त्यांनी लगावला.