नागपूर : परिचारिकांच्या संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. या संपामुळे नागपुरातील मेयो आणि मेडिकलमधील आरोग्य सेवा कोलमडलीय. एकीकडे राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढलीय. तर दुसरीकडे परिचारिकांचा संप सुरू आहे. परिचारिकांचे आऊटसोर्सिंग (Outsourcing) करू नका, कायमस्वरूपी भरती करा, केंद्र सरकारप्रमाणे समान वेतन द्या, या मुख्य मागण्यांसाठी राज्य परिचारिका संघटनेचा (Nursing Association) संप पुकारलाय. या संपामुळे नागपूर मेडिकल आणि मेयो रुग्णालयात येणाऱ्या हजारो रुग्णांना फटका बसलाय. रास्त मागण्यांसाठी परिचारिकांकडून संप पुकारण्यात आलाय. त्यामुळे त्या मागण्या मान्य करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. असे सांगत डागा शासकीय स्मृती स्त्री रुग्णालय तसेच प्रादेशिक मनोरुग्णालयातील परिचारिकांनी सुपर (Super), मेयो, मेडिकलमध्ये सुरू असलेल्या परिचारिकांच्या संपाला पाठिंबा दिलाय.
राज्य शासनाकडे आपल्या प्रलंबित विविध मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून शनिवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले. प्रशासनाकडून रुग्णांचे हाल होत आहेत. अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षकांचे कार्यालय कुलूपबंद आहे. कोलमडलेली रुग्णसेवा सुधारण्यासाठी कोणतेही नियोजन नसल्याचे दिसून येते. मेडिकल, सुपरमधील सर्व ऑपरेशन थिएटर बंद आहेत. काल सकाळी मेडिकलमध्ये एकही शस्त्रक्रिया झाली नसल्याची माहिती आहे. केवळ ट्रॉमा केअर युनिटमध्ये एक इर्मजन्सी शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती आहे.
मेडिकलमध्ये सुमारे एक हजार परिचारिका आहेत. यापैकी संपादरम्यान सकाळी फक्त सोळा परिचारिका कर्तव्यावर हजर होत्या. 984 परिचारिका संपात सहभागी होत्या. मेडिकलमध्ये दुसर्या पाळीत केवळ सात परिचारिकांची उपस्थिती होती. मेयो रुग्णालयातही हीच स्थिती होती. सुपर स्पेशालिटीमध्ये 100 पैकी 7 परिचारिका रुग्णसेवेत हजर होत्या. यामुळे मेडिकलमध्ये असलेले 52 वॉर्ड परिचारिकांशिवाय आहेत. कॅज्युल्टीतदेखील एकही परिचारिका नसल्यामुळे रुग्णांना प्रचंड हाल सहन करावे लागले.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक तसेच परिचर्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांच्या उन्हाळी सुट्या रद्द केल्या आहेत. त्यांना त्वरित कामावर रुजू होण्याचेही निर्देश दिलेत. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त असणार्या परिचर्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अध्यापकांना त्वरित कर्तव्यावर रुजू होण्याच्या सूचना केल्या आहेत.