कर्नाटकच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राची बदनामी; सीमावादाची दुसरी बाजू राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने सांगितली…
आमदार रोहित पवार यांनी सीमाबांधवांसाठी आम्ही सरकारकडे दाद मागणार असून सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये कर्नाटकच्या विरोधात आपण कायदा आणणार आणि तो कायदा पास करावा यासाठी आग्रह धरणार अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
नागपूरः हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील आज पहिला दिवस आहे. ज्यावेळी अधिवेशन सुरु झाले त्यावेळीच सर्वपक्षीय बैठकीत कर्नाटक विरोधात ठराव मांडायचा हे पक्के झाले होते. मात्र दोन आठवडे होऊन गेल्यावरही कर्नाटक सरकारने महाराष्ट्राविरोधात हिवाळी अधिवेशनात ठराव मांडूनही महाराष्ट्र सरकारने मात्र अजून ठराव मांडला नसल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. सरकारने कर्नाटक सरकारविरोधात ठराव का मांडला नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
आगामी काळात कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे त्या कर्नाटकच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातो आहे अशी जोरदार टीका रोहित पवार यांनी केली आहे.
कर्नाटक सरकाने त्यांच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही असा ठराव पास केला आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने त्यांच्या विरोधातील कोणताही ठराव अजून पास केला नसल्याचे सांगत शिंदे-फडणवीस सरकारवर त्यांनी हल्लाबोल केला आहे.
सीमाभागातील मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारने वारंवार अन्याय अत्याचार केले आहेत. नोव्हेंबर महिन्यातही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा सांगून महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारविरोधात कोणताही आवाज उठविला नाही.
आमदार रोहित पवार यांनी सीमाबांधवांसाठी आम्ही सरकारकडे दाद मागणार असून सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये कर्नाटकच्या विरोधात आपण कायदा आणणार आणि तो कायदा पास करावा यासाठी आग्रह धरणार अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
महाराष्ट्र सरकारने कर्नाटक विरोधात ठराव पारित केला नाही मात्र कर्नाटकच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव मात्र आखला जातो आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.