अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन थेट नागपूर अधिवेशनात; कर्तव्यदक्ष आमदार म्हणाल्या, हिरकणी कक्ष स्थापन करा
बाळाला सभागृहात घेऊन जाणार नाही. त्याला पक्ष कार्यालयात ठेवून मी सभागृहात जाईल. बाळाला सभागृहात नेऊ शकत नाही. तो योग्य नाही.
नागपूर: कोणतीही गोष्ट करताना त्यात कर्तव्य हे सर्वात श्रेष्ठ असतं हे आपण वारंवार पाहत आलो आहोत. आजपासून नागपूरमध्ये सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात हीच कर्तव्य भावना पाहायला मिळाली. आमदार आणि आता आई झालेल्या सरोज अहिरे यांच्या माध्यमातून ही कर्तव्य भावना पुन्हा पाहायला मिळाली. सरोज अहिरे आज अधिवेशनात आपल्या अडीच वर्षाच्या बाळाला घेऊन आल्या. अडिच महिन्याच्या बाळाला सरोज अहिरे घेऊन आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मी आमदार आहे आणि आता आईही झाले. त्यामुळे दोन्ही कर्तव्य बजावणे माझं काम आहे, असं सरोज अहिरे म्हणाल्या.
नाशिक जिल्ह्यातील देवळालीच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनात आल्या. एक आई म्हणून बाळाची काळजी घेतेय. तर एक आमदार म्हणून मतदारांना न्याय मिळावा म्हणून अधिवेशनात सहभागी व्हायला आलेय. विधानभवन परिसरात फिडिंग रुम किंवा हिरकणी कक्ष व्हावा” अशी मागणी सरोज अहिरे यांनी केलीय.
राजकीय धडे नाही. आमदार म्हणून माझं कर्तव्य आहे. माझ्या मतदारसंघातील काही प्रश्न आहे. ते मांडण्याची अधिवेशनात संधी असते. ती मला गमवायची नव्हती. बाळ अडीच महिन्याचं झालं आहे. त्याला सोडून येऊ शकत नव्हते. ते खूपच लहान असल्याने मला बाळाला घेऊन यावं लागलं, असं त्या म्हणाल्या.
वातावरण कसंही असलं तरी शिंदे सरकार असो किंवा ठाकरे सरकार असो शेवटी मतदारसंघातील प्रश्न सोडवणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी वातावरण कसंही असलं तरी आपले प्रश्न मांडण्यासाठी यावं लागतं, असंही त्यांनी सांगितलं.
विधान भवन परिसरात फिडिंग रुम असावा किंवा हिरकणी कक्ष असावा अशी मी आणि नमिताताई मुंदडा यांनी मागणी केली होती. आमच्या या मागणीकडे सरकारने लक्ष द्यावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बाळाला सभागृहात घेऊन जाणार नाही. त्याला पक्ष कार्यालयात ठेवून मी सभागृहात जाईल. बाळाला सभागृहात नेऊ शकत नाही. तो योग्य नाही. पण विधानभवनात पाळणा आणि फिडिंगची व्यवस्था असावी, असं त्या म्हणाल्या.
आमदार आणि आई या दोन्ही भूमिका निभावताना महिलांची कसोटी लागते. पण आमदार आणि आई म्हणून मी दोन्ही कर्त्यव्य जबाबादरी पार पाडेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं.