नागपूरः विधान परिषद निवडणुकीत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या छोटू भोयर यांना केवळ एकच मत पडले. काँग्रेसमध्ये त्यांची पूर्ण फसवणूक झाली, अशी चर्चा आहे. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पहिली प्रतिक्रिया नोंदवली.
भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या छोटू भोयर यांना एकच मत पडले, यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस अत्यंत मिश्कीलपणे हसले. ते म्हणाले, मला वाटतं की ते एक मत त्यांचं स्वतःतं आहे. ते काँग्रेसमध्ये गेले ही पहिली चूक केली. तिथे गेल्यानंतर त्यांची जी अवस्था झाली ती सर्वांनीच पाहिली. त्यामुळे त्यांना जे मत पडलं आहे, तेही काँग्रेसला नव्हे तर छोटू भोयर यांना स्वतःला मिळालं आहे, असं मला वाटतं.
नागपूर विधन परिषद निवडणुकीत आज भाजपच्या विजयापेक्षा काँग्रेसच्या छोटू भोयर यांच्या पराभवाचीच चर्चा जास्त रंगलीय. छोटू भोयर यांची कारकीर्द भाजपात गेली. गडकरींसोबत त्यांनी पक्षाचं काम केले. नगरसेवक ते ज्येष्ठ नगरसेवक अशी कारकीर्द गाजवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत ते घडले. पण गेल्या काही दिवसांपासून पक्षात अपमान होत असल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसनं त्यांना उमेदवारी दिली, पण भोयर हे प्रचारास रस दाखवत नसल्यानं काँग्रेसनं अपक्ष मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या भोयर यांना कुणीही मत दिलं नाही. मतमोजणीत चंद्रशेखर बावनकुळे यांना 362, डॉ. रवींद्र भोयर (छोटू भोयर) यांना 1 तर मंगेश सुधाकर देशमुख यांना 186 अशी मतं पडली.
इतर बातम्या-