विरोध झेलला, ‘सामना’ केला, आता हायकोर्टाचा निर्णय, मविआच्या नागपूर सभेबद्दल सर्वात मोठी अपडेट
महाविकास आघाडीच्या आगामी सभेच्या जागेवरुन वाद निर्माण झालेला. अनेकांनी या सभेची जागा बदलण्यात यावी, अशी मागणी केलेली. विशेष म्हणजे हे प्रकरण थेट मुंबई हायकोर्टापर्यंत पोहोचलं. त्यानंतर आता या प्रकरणाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
नागपूर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता नागपुरात (Nagpur) महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) वज्रमूठ सभा आयोजित करण्यात आलीय. महाविकास आघाडीच्या या वज्रमूठ सभेला भाजपकडून (BJP) विरोध करण्यात आला. विशेष म्हणजे याबाबतचं प्रकरण थेट हायकोर्टापर्यंत पोहोचलं. महाविकास आघाडीच्या नागपुरात होणाऱ्या सभेला परवानगी मिळू नये, अशी मागणी हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी केली होती. पण त्यांची याबाबतची मागणी हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची नागपुरात पुढची सभा होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. हायकोर्टाने याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाल्याचं मानलं जात आहे.
महाविकास आघाडीची नागपुरातील दर्शन कॅालनी मैदानात वज्रमुठ सभा होणार आहे. पण या सभेसाठीची परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणी हायकोर्टात करण्यात आली. तरीही हायकोर्टाने वज्रमूठ सभेची परवानगी रद्द करावी ही मागणी अमान्य केली. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला असल्याचं मानलं जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
दर्शन कॅालनी मैदान बचाव समितीच्या वतीने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. स्थानिक नागरीक धिरज शर्मा, गजानन देवतळे आणि रोशन आकरे यांच्या वतीने याबाबतची याचिका दाखल करण्यात आलेली. वज्रमूठ सभेची परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली. पण हायकोर्टाने ही याचिका फेटाळली. दरम्यान, दर्शन कॅालनी मैदानाच्या आरक्षणाबाबत 24 तारखेला पुढील सुनावणी होणार आहे.
भाजप आमदाराचादेखील विरोध
विशेष म्हणजे नागपूरमध्ये दर्शनी कॉलनी मैदानात महाविकास आघाडीची सभा होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वात आधी तेथील भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी विरोध करायला सुरुवात केली. संबंधित मैदान हे खेळासाठी राखीव आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी राजकीय सभा होऊ नये, अशी खेळाडूंची मागणी असल्याचं आमदार कृष्णा खोपडे म्हणाले होते. पण दुसरीकडे काँग्रेस नेते सुनील केदार यांनी सभा ही दर्शनी कॉलनी मैदानातच होईल, असं ठामपणे म्हटलं. त्यामुळे या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु झालेला बघायला मिळाला. पण या प्रकरणात कोर्टानेच महाविकास आघाडीला दिलासा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या होमग्राउंडवर मविआची सभा
दुसरीकडे नागपूर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होमग्राउंड आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते फडणवीसांच्या होमग्राउंडवर येऊन काय निशाणा साधतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. राज्यात सध्या भाजप-शिवसेनेचं सरकार आहे. पण असं असताना शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झालाय. त्यामुळे या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीचे नेते फडणवीसांना त्यांच्या होमग्राउंडवर डिवचण्याचा प्रयत्न करणार असल्याची शक्यता आहे.