Nagpur Accident : नागपूरमध्ये पुन्हा वेगाचा थरार, वाढदिवसाची पार्टी ठरली अखेरची, भरधाव कार रेलिंगला धडकली, दोघांचा मृत्यू
Car Accident : नागपूरमध्ये भरधाव कार रेलिंगला धडकल्याने दोन मित्रांचा मृत्यू झाला. तर इतर काही जण गंभीर जखमी झाले. हे सर्व जण वाढदिवसाची पार्टी साजरी करुन घरी परतत होते. पण कारवरचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली.
राज्यात हिट अँड रनची एकामागून एक प्रकरण घडत आहेत. तर नागपूरमध्ये भरधाव कार पलटी झाल्याने दोघांचा जीव गेला. तर त्यांचे इतर मित्र गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी कोराडी परिसरात एक कार रस्त्याच्या दुर्तफा लावलेल्या एका बाजूच्या रेलिंगवर जाऊन धडकली. त्यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर अन्य तीन गंभीर जखमी झाले. हे तरुण वाढदिवसाची पार्टी साजरी करुन परतत होते. पण ही त्यांची अखेरची पार्टी ठरली. कारवरील नियंत्रण हुकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
BSNL कार्यालयाजवळ अपघात
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातातील मयत हे एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेले होते. परत येताना हा अपघात झाला. त्यात विक्रम ऊर्फ आयुष मधुकर गाडे(20), आदित्य प्रमोद पुन्नपवार(19) यांचा मृत्य झाला. तर अन्य तीन जय गणेश भोंगडे, सुजल राजेश मनवतकर आणि सुजल प्रमोद चव्हाण हे गंभीर आहेत. दुर्घटनेपूर्वी हे पाच जण विक्रम नावाच्या घरी वाढदिवसाच्या पार्टीसाठी एकत्र आले होते. परताना कारवरील नियंत्रण सुटले. पांजरा परिसरातील बीएसएनएल कार्यालयाजवळील रेलिंगला कार धडकली. जय भोंगडे ही कार चालवत असल्याचे समोर आले आहे. रेलिंगला धडक दिल्यानंतर कार पलटी झाली.
CCTV फुटेज सोशल मीडियावर
या कार अपघाताचे सीसीटीव्ही व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले. कोराडी पोलिसांनुसार, हा अपघात का झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण अपघात अत्यंत भीषण असल्याचे समोर येत आहे. या अपघातात कारचा चुरडा झाला आहे. अनियंत्रित कारने सहा बॅरिकेट तोडले आणि ती डिव्हायडरवर आदळली. त्यानंतर ती पलटी झाली. यात आयुष मधुकर गाडे आणि आदित्य प्रमोद पुन्नपवार यांचा मृत्यू झाला. अन्य गंभीर आहेत. या कार अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.