विदर्भवाद्यांकडून नागपूर कराराची होळी, विदर्भवाद्यांचा निर्धार, वेगळ्या विदर्भाची मागणी
आर्थिक व पदभरतीच्या संदर्भातही विदर्भावर झालेल्या अन्यायाचा आंदोलकांनी पाढा वाचला.
गजानन उमाटे, Tv 9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या (separate Vidarbha ) आंदोलनाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज विदर्भवाद्यांकडून नागपूर कराराची होळी करण्यात आलीय. 28 सप्टेंबर 1953 रोजी नागपूर करार झालाय. या करारात अकरा कलमं आहेत. पण त्याचं पालन होत नाही, असा आरोप करत विदर्भवाद्यांनी नागपूर कराराची आज होळी केलीय. विदर्भातील प्रत्येक तालुक्यात हे आंदोलन होत असल्याचं यावेळी विदर्भवाद्यांनी (Vidarbha activists) सांगितलंय.
वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाची ही शेवटची लढाई आहे, आता आम्हाला महाराष्ट्रात रहायचं नाही. 2023 मध्ये स्वतंत्र विदर्भ घेतल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत आज विदर्भवाद्यांनी नागपूर कराराची होळी केलीय. विदर्भवादीनेते मुकेश मासूरकर यांनी यावेळी संवाद साधला.
…तरी विदर्भावरील अन्याय दूर होणार नाही
चंद्रपुरात विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आंदोलन केले. स्थानिक गांधी पुतळ्यापुढे नागपूर कराराची होळी करून आंदोलकांनी केंद्र-राज्य सरकारचा निषेध केला. ब्रम्हदेव जरी मुख्यमंत्री झाला तरी विदर्भावरील अन्याय महाराष्ट्र दूर करू शकत नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
आर्थिक व पदभरतीच्या संदर्भातही विदर्भावर झालेल्या अन्यायाचा आंदोलकांनी पाढा वाचला. 2027 च्या आत निकराचा संघर्ष करून वेगळे विदर्भ राज्य मिळवू असा निर्धार व्यक्त करण्यात आला. कर्जबाजारी झालेल्या महाराष्ट्र राज्याने विदर्भाच्या बाबतीत अवलंबलेले सापत्न धोरण आता अधिक काळ चालू देणार नाही असे विदर्भवादी नेते अॅड. वामनराव चटप यांनी ठणकावले.
राज्य सरकारवर कर्ज आहे. पगार द्यायला पैसे नाहीत. पोलीस, डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत. आमच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळं वेगळा विदर्भ द्यावा, अशी मागणी आहे. वेगळा विदर्भ देण्याची पंतप्रधानांना सुबुद्धी देवो यासाठी प्रार्थना करणार असल्याचं वामनराव चटप यांनी सांगितलं.