नागपूर : आई आणि मुलाचं नातं तसं हळवं. लहाणपणापासून जिच्या अंगाखांद्यावर खेळतो, तीच आपल्या डोळ्यासमोर निघून जात असेल, तर त्याचं दु:ख जरा जास्तच. असाच एक प्रसंग अंबाझरी तलावात घडला. आई तू मला सोडून का गेलीस, म्हणून हा युवक गेल्या दोन महिन्यांपासून नैराश्यात होता. रविवारी त्यानं अंबाझीर तलावात आत्महत्येचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्याला वाचविलं.
नागपूरच्या अंबाझरी तलावात एक अज्ञात शव सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे रविवारी सकाळी पोलीस अंबाझरी तलावावर पोहचले. पोलिसांची कारवाई सुरु असताना तलावात पाण्यात एकजण उडी घेतल्याचे पोलिसांना दिसले. वेळ न घालवता काही पोलीस कर्मचाऱ्यांनी पाण्यात उडी घेतली. सोबतच तैराकांच्या मदतीने त्या तरुणाला पोलिसांनी पाण्यातून बाहेर काढले. त्या तरुणाची अवस्था पाहून पोलीसही गहिवरले. पोलिसांच्या सतर्कतेने एका नैराश्यात असलेल्या युवकाचा जीव वाचला, अशी माहिती अंबाझरीचे पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांनी दिली.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी चंद्रमणीनगरातील जलतरणपटू देवीदास जांभूळकर यांना सोबत घेतले. अंबाझरी तलावातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो मृतदेह कामगार कॉलनीतील राजेश काळे (वय ५०) यांचा होता. त्याचा पंचनामा करत असताना पंप हाऊसच्या बाजूला एका तरुणानं तलावात उडी घेतली. पोलिसांनी जांभूळकरच्या मदतीनं त्या युवकाला बाहेर काढले. निरीक्ष हरिदास मडावी, सहायक निरीक्षक आचल कपूर, अंमलदार प्रशांत गायधने यांनी युवकावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्याचे समुपदेशन करण्यात आले.
या वीस वर्षीय युवकाच्या आईचा मृत्यू कारंजालाडजवळ ऐन दिवाळीच्या दिवशी एका अपघातात झाला. आईचा झालेला अपघात त्यानं स्वतःच्या डोळ्यानं पाहिला. तेव्हापासून तो नैराश्यात होता. यापूर्वीही त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं. रविवारी सकाळीच तो घराबाहेर पडला होता. त्याचे वडील आणि मामा युवकाचा शोध घेत होते. पाण्यातून बाहेर काढल्यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची समजूत काढून वडिलांच्या स्वाधीन केलं.