भाजपच्या महिला नेत्या सना खान बेपत्ता; 8 दिवसांपासून पत्ता नाही
एक ऑगस्टला सना खान या जबलपूरला गेल्या. दोन ऑगस्ट रोजी सना खान यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांचा फोन स्वीच ऑफ येत आहे.
नागपूर : नागपुरातील भाजपच्या नेत्या सना खान एक ऑगस्टपासून बेपत्ता आहेत. त्यांना जबलपूर येथील एकाने जीवे मारण्याची धमकी दिली होती. जबलपूरला गेल्यानंतर दोन दिवसांनंतर त्यांचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे सना खानच्या आईने पोलीस मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तेव्हापासून पोलीस सना खान यांचा शोध घेत आहेत. मात्र या दरम्यान जबलपूर येथे एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची चर्चा सुरू झाली. त्याची पुष्टी अद्याप नागपूर पोलिसांनी केलेली नाही. यासंदर्भात झोन दोनचे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी देखील हे वृत्त सध्या निराधार आल्याचं म्हंटलं आहे.
मानकापूर पोलीस जबलपूरला रवाना
शहर भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक महिला नेत्या सना खान गेल्या ८ दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या संदर्भात काही महत्त्वाचे धागेदोरे नागपूर पोलिसांच्या हाती लागले आहे. सना खान यांच्यासोबत घातपात झाला, अशी चर्चा नागपूर सुरू झाली आहे. मात्र, नागपूर पोलिसांनी यासंदर्भातील वृत्त फेटाळून लावले. शहरातील मानकापूर पोलिसांचे पथक मध्यप्रदेशच्या जबलपूरला रवाना झाले आहे.
सना खान जबलपूरला गेल्याची माहिती
पश्चिम नागपूरच्या महिला भाजपच्या नेत्या सना खान एक ऑगस्टपासून नागपुरातून बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्यासाठी मानकापूर पोलीस प्रयत्न करत आहेत. त्यांचा शोध हा मध्यप्रदेशच्या जबलपूर शहराच्या दिशेने गेला आहे. त्यामुळे मानकापूर पोलिसांचे एक पथक जबलपूरकडे रवाना झाले आहे.
सना खान कुणासोबत गेल्या?
पोलीस उपायुक्त राहुल मदने म्हणाले, सना खान यांच्याबद्दल तीन ऑगस्ट रोजी मिसिंग मानकापूर पोलिसांत दाखल आहे. एक ऑगस्टला सना खान या जबलपूरला गेल्या. दोन ऑगस्ट रोजी सना खान यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांचा फोन स्वीच ऑफ येत आहे.
यासंदर्भात जबलपूर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. सना खान यांचा शोध जबलपूर पोलिसांच्या मदतीने सुरू आहे. ज्या व्यक्तीसोबत गेल्याचा संशय आहे तोही व्यक्ती फरार आहे. त्या कुणाच्या सोबत गेल्याचा संशय आहे, हे पोलिसांनी सांगणं टाळलं. यासंदर्भात जबलपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.