गजानन उमाटे, प्रतिनिधी, नागपूर | 28 ऑक्टोबर 2023 : अजित पवार हे भाजपसोबत जात सत्तेत सामील झाले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले. महाविकास आघाडीतून बाहेर पडत अजित पवार गट महायुतीत सामि झाला. अशातच आता लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये जागा वाटप कसं होणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मोठा दावा केला आहे. येत्या निवडणुकीत अजित पवार गट ताकदीने लढणार आहे, असं धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितलं आहे.
आम्हाला वाटतं की, अजितदादा पवार मुख्यमंत्री व्हावेत. राज्याच्या प्रमुखपदी बसावेत. त्यासाठी आम्ही मेहनतही करतोय. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही 100 जागांवर आम्ही लढणार आहोत. या 100 पैकी 90 आमदार निवडून आणणार आहोत. अजितदादा यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आमची ताकद आम्ही वाढवतोय. भंडारा, गोंदियासह संपूर्ण विदर्भात 15 जागा आम्ही लढणार आहोत. आणि 15 जागा निवडून आणणार आहोत, असा दावा धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे.
भाजपकडून एक ट्विट करण्यात आलं या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. मी पुन्हा येणार हा देवेंद्र फडणवीस यांचा व्हीडिओ भाजपकडून ट्विट करण्यात आला. पुढच्या तासाभरात हे ट्विट डिलीट करण्यात आलं. पण या व्हीडिओने देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. त्यावरही धर्मारावबाबा आत्राम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काल भाजपने ते ट्विट केलं होतं. पण नंतर भाजपने ते ट्वीट डिलिट केलं आहे. सध्या एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री राहणार आहेत, असं भाजपने सांगितलं आहे. त्यामुळे सध्या एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री आहेत. पण अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. ते आमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ताकद उभी करतोय, असं धर्मारावबाबा आत्राम म्हणाले.
दिवाळीच्या पार्श्वभुमीवर भेसळखोरांवर अन्न आणि औषध प्रशासन विभाग धडक कारवाई करणार आहे. नुकतंच नागपुरातील हल्दीरामवर आमच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केलीय. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाईचं टार्गेट दिलंय. भेसळखोरांवर चार पाच दिवसांत आणखी कारवाई करणार आहोत. दिवाळीत भेसळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार आहोत, असंही आत्राम म्हणाले.