लोका सांगे ब्रह्मज्ञान…. नागरिकांना दटावणाऱ्या पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची विनामास्क भ्रमंती
मास्क का घातला नाही, हे विचारल्यानंतर अशोक पाटील यांनी टोलटोलवी करत हा विषय हसण्यावारी नेला. | Nagpur Mahangarpalika
नागपूर: कोरोनाचा प्रसार (Coronavirus) रोखण्यासाठी मास्क वापरा असे वारंवार सांगूनही नागरिकांकडून प्रशासनाच्या सूचनांचे पालन होत नसल्याचे अनेक प्रकार आतापर्यंत समोर आले आहेत. मात्र, नागपुरात (Nagpur) प्रशासनातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांकडूनच नियमांना हरताळ फासला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागपुरात रविवारी पालिकेचे सहाय्यक आयुक्त अशोक पाटील हेच विनामास्क फिरताना आढळून आले. (Coronavirus spread increases in Nagpur)
बडकस चौकातील इमारतींमध्ये पालिकेच्या पथकांकडून कारवाई सुरु होती. त्यावेळी नागरिकांना नियमांची आठवण करुन देणारे सहायक आयुक्त मात्र बिनधास्त विनामास्क फिरत होते. मास्क का घातला नाही, हे विचारल्यानंतर अशोक पाटील यांनी टोलटोलवी करत हा विषय हसण्यावारी नेला. एरवी सर्वसामान्यांवर तत्परतेने कारवाई करणारी महानगरपालिका गप्प का, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे आता अशोक पाटील यांच्यावर कारवाई होणार का, हे आता पहावे लागेल.
गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये नागपूरचाही समावेश आहे. नागपुरात सध्या दिवसाला 1000 ते 1200 नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. तरीही प्रशासनातील अधिकारीच हलगर्जीपणा करत असल्याचे समोर आल्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या कारभारावर सध्या टीका होत आहे.
राज्यात आठवडय़ाभरात 50 हजार करोनाबाधित
राज्यात एका आठवडय़ातील रुग्णसंख्या 50 हजारांहून अधिक नोंदली गेली आहे. पाच महिन्यांनंतर प्रथमच रुग्णांच्या संख्येत इतकी वाढ नोंदवली गेली आहे. अकोला, अमरावती, वाशिम आणि जळगाव येथे सर्वाधिक रुग्णवाढ झाली आहे, तर अमरावती येथे मृतांच्या संख्येत सर्वाधिक म्हणजे 11 टक्के वाढ झाली आहे.
विवाह सोहळे आणि लोकलमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
विवाह सोहळे, सार्वजनिक कार्यक्रम आणि लोकल ट्रेनमुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे केंद्रीय पथकाने म्हटले आहे. तीन सदस्यीय केंद्रीय पथकाने 1 आणि 2 मार्च रोजी दौरा करून महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी केंद्रीय पथकाने हे निष्कर्ष नोंदवले होते. राज्यातील आरोग्य यंत्रणाही सुस्तावल्याचे केंद्रीय पथकाने अहवालात नमूद केले आहे. आगामी काळात कोरोनाचा प्रसार करण्यासाठी चाचण्यांची संख्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यावर भर द्यावा, अशी सूचना केंद्रीय पथकाने राज्य सरकारला केली आहे.
संबंधित बातम्या:
कोविड रुग्णाला मुदतबाह्य औषधांचे वाटप, बुलडाणा जिल्ह्यात हे चाललंय तरी काय?
नागपुरात कोरोनाचं संकट गडद, दररोज हजारच्यावर नवे रुग्ण, प्रशासन चिंतेत
कोरोनाने घेरले, नागपूर आज आणि रविवारी बंद; मिनी लॉकडाऊनही सुरू
(Coronavirus spread increases in Nagpur)