नागपूर : फेब्रुवारी महिना शांत होता. एकही खुनाची घटना नागपूर शहरात (Nagpur City) घडली नाही. पण, मार्च महिना रक्तपातात गेला. एक-दोन नव्हे तब्बल नऊ खुनाच्या घटना घडल्या. त्यामुळं शहर पुन्हा अस्वस्थ झाले आहे. या बहुतांश घटना या नातेवाईकांमध्ये असलेल्या वादातून झाल्या आहेत. दारुच्या नशेत दोन घटना घडल्या. तर कौटुंबीक वादातून (Family Disputes) तीन खून करण्यात आले आहेत. व्यवसायिक वादातून दोन खून झाले. फुटपाथवर झोपण्यावरून एका मजुराने दुसऱ्या मजुराला जीवानिशी ठार केले. तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या (Criminal Tendency) आरोपींने शुल्लक कारणातून एका युवकाला भोसकले.
पहिली घटना वाठोडा पोलीस हद्दीत घडली. वाठोडा रिंगरोडजवळ जायस्वाल दारू भट्टी आहे. याठिकाणी राजू भगवानदास चेलीकसवाई (वय 35) याचा खून करण्यात आला. हा खून राजू दारूच्या नशेत असताना त्याच्या मित्रांनीच केला. अमन मेश्राम व अन्य मित्रांनी राजूचे डोकेच फोडले. ही घटना पाच मार्च रोजी घडली.
दुसरी घटना एमआयडीसी पोलीस हद्दीतील राजीवनगर येथील आहे. कौटुंबीय कहलातून पत्नी व मुलीचा नवऱ्यानेच खात्मा केला. विलास गवते हा दूध विक्रेता. त्याने पत्नी व मुलगी झोपेत असताना कोयत्याने दोघींचाही गळा कापला. रंजना गवते (वय 36) व मुलगी अमृता गवते (वय 13) या दोघींचाही जीव गेला. या घटनेचे एमआयडीसी परिसर चांगलाच हादरला. ही दुहेरी खुनाची घटना बारा मार्च रोजी घडली.
तिसरी घटना ही नंदनवर पोलीस हद्दीत घडली. नानोटे कुटुंबीय झोपडपट्टीत राहत होते. भावा-भावात वाद झाला. या वादाचं पर्यवसान खुनात झालं. शुभम नानाटे या युवकाचा त्याचा भाऊ नरेंद्र नानोटेनं गळा दाबून खून केला. त्याने आई रंजना नानोटे यांना सोबत घेतलं. भाऊबंदकीतून हा खून झाला.
चौथी घटना कळमना आरटीओ कार्यालयासमोर घडली. पंधरा मार्चची दुपारची गोष्ट. टायर मोल्डिंगचं काम सुरू होतं. ऑटोचालक आणि टायर मोल्डिंगचं काम करणाऱ्यांमध्ये कामावरून वाद झाला. या वादात टायर मोल्डिंगचं काम करणाऱ्यानं भुऱ्या बनकर (वय 24) याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. गळ्यावर वार झाल्याने भुऱ्या बनकर या ऑटोचालकाला अंतिम श्वास घ्यावे लागले. ही घटना पंधरा मार्च रोजी घडली.
पंधरा मार्चला आणखी एक खुनाची घटना घडली. पारडी चौकात रात्री झोपण्याच्या जागेवरून वाद झाला. एका मजुराने दुसऱ्या मजुराला झोपण्याच्या जागेवरून शिविगाळ केली. हा राग मनात ठेवून आरोपीने सोनू काशीराम बनकर हा रात्री झोपेत असताना गट्टू त्याच्या डोक्यावर मारला. सोनू घटनास्थळीच गतप्राण झाला. सीसीटीव्ही तपासातून या घटनेतील आरोपीचा शोध लागला.
कोतवाली पोलीस हद्दीत शिवाजीनगर आहे. या परिसरात सहावी घटना खुनाची घटना बावीस मार्च रोजी घडली. शुल्लक कारणातून मनीष यादव या पंचेवीस वर्षीय युवकाचा गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या आरोपींशी भांडण झाले. त्यांनी सरळ चाकूच काढला. या चाकूने मनीषला भोसकले. यात मनीषचा मृत्यू झाला.
सातवी खुनाची घटना वाठोडा ठाण्याच्या हद्दीत घडली. बीडगाव येथील प्लास्टिक कारखान्यात मजुराचा खून करण्यात आला. सलीम ऊर्फ रिंकू परासिया (वय 31) असं मृतकाचं नाव आहे. दारूच्या नशेत अल्पवयीन साथीदारांनी सलीमच्या डोक्यावर दांड्याने प्रहार केला. यात सलीमचा जीव गेला. ही घटना 23 मार्च रोजी घडली.
समर्थ नगरातील दीपा दास (41) स्कूल कंडक्टर होत्या. दीपा बचत गटाचे काम करून आर्थिक व्यवहार सांभाळायची. दीपाने सुवर्णाला एक लाख रुपये कर्जाच्या रुपात दिले होते. पैसे परत करण्यासाठी सुवर्णा व तिचे पती टाळाटाळ करत होते. यातून झालेल्या वादात सुवर्णा व तिच्या पतीने दीपाला संपविले. रागाच्या भरात सुवर्णाच्या पतीने दीपाचा गळा ओढणीने आवळला. मृत झाल्यानंतर तिचा मृतदेह उप्पलवाडीत नेऊन फेकून दिला होता.