Nagpur Hospital Death : राज्याची आरोग्यव्यवस्था ‘व्हेंटिलेटर’वर; उपराजधानी नागपूरसह इतर ठिकाणी औषधांचा तुटवडा
Mayo Hospital Medicines Shortage : कुठे ऑक्सिजनचा अभाव तर कुठे औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्याची आरोग्यव्यवस्था 'व्हेंटिलेटर'वर आहे. नागपूरसह अन्य ठिकाणी औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. आरोग्यविभागाचं 'स्वास्थ' कसं? वाचा सविस्तर...
नागपूर | 04 ऑक्टोबर 2023, गजानन उमाटे : नांदेडमध्ये 24 तासात 24 रुग्णांचे मृत्यू झाल्याची घटना समोर आली. त्यानंतर आरोग्य व्यवस्थेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. राज्यभरातील सरकारी रुग्णलयातील रूग्णांच्या मृत्यूची आकडेवारी समोर येत आहे. ठिकठिकाणी औषधांचा तुटवडा भासत आहे. औषधांच्या अभावामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. यामुळे राज्याची आरोग्यव्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचं स्पष्ट होतंय. राज्याची उपराजधानी नागपूरमधील मेयो रूग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णसेवा अडचणीत आली आहे. अशात आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात देखील आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचं दिसत आहे.
नागपूरमधील मेयो रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या केवळ आयसीयूमध्ये असणाऱ्या रूग्णांना आणि शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांनाच औषधांची सुविधा दिली जात आहे. टीटी इंजेक्शन आणि स्पिरीटचाही तुटवडा निर्माण झाला आहे. नागपूरच्या सरकारी रूग्णालयात 24 तासात 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मेडिकल रूग्णालयात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मेयो रूग्णालयात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे उपराजधानीत व्यवस्थेचं ‘आरोग्य’ धोक्यात असल्याचं चित्र आहे.
धाराशिवमध्ये 14 महिन्याच्या बाळाचा मृत्यू
आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या धाराशिव मतदारसंघात आरोग्य यंत्रनेचे तीन तेरा वाजलेत. ऑक्सिजन अभावी 14 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप या बाळाच्या नातेवाईकांनी केला आहे. वेळेवर उपचार व डॉक्टर नसल्याने बाळाचा मृत्यू झाला असल्याचं या बाळाचे नातेवाीक म्हणत आहेत. आरोप धाराशिव जिल्ह्यातील भुम ग्रामीण रुग्णालयातील ही घटना आहे. धाराशिवमध्ये रुग्णांना उपचार मिळत नाहीत. त्यामुळे आरोग्ययंत्रणा कोलमडल्याचं चित्र आहे.
कोल्हापुरातील रुग्णमृत्यू आकडेवारी
कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामध्ये दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू होतो आहे. सप्टेंबर महिन्यातील मृतांची आकडेवारी समोर आली आहे. सीपीआर रुग्णालयात सप्टेंबर महिन्यात 228 जणांचा मृत्यू झाला आहे. या 29 बालकांचाही समावेश आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर 24 तासाच्या आत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 24 तासानंतर 163 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अतिशय गंभीर रुग्णांना शेवटच्या सनी सीपीआर रुग्णालयात दाखल केल्या जात असल्याने मृतांची संख्या जास्त असल्याचा दावा सीपीआर रुग्णालयाच्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे.