नितीन गडकरी यांना पुन्हा धमकी! 10 कोटींची खंडणी मागितली, स्वतःचं नावही सांगितलं… काय घडतंय?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नागपुरातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून यामागे नेमकं कोण आहे, याचा शोध घेतला जातोय.
गजानन उमाटे, नागपूर | राज्याच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावे, अशा एकामागून एक घटना घडत आहेत. मागील आठवड्यात थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांना ब्लॅकमेलिंगचं प्रकरण समोर आलं तर आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्या कार्यालयात सदर धमकीचा फोन आल्याने महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. दोन महिन्यांपूर्वीदेखील नितीन गडकरी यांना आलेल्या धमकीमुळे राज्यातील यंत्रणा अलर्ट झाली होती. मात्र त्या प्रकारात कुणीतरी खोडसाळपणा केल्याचं निष्पन्न झालं होतं.
धमकीचे 3 फोन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पुन्हा एकदा धमकीचे फोन आले. आज सकाळी गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे तीन फोन आले असल्याची माहिती समोर आली. एवढंच नव्हे तर धमकी देणाऱ्याने 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. विशेष म्हणजे धमकी देणाऱ्याने स्वतःचं नाव जयेश पुजारी असल्याचं म्हटलं आहे. पुन्हा एकदा जयेश पुजारी याच्या नावाने धमकीचे फोन आल्याने पोलीस यंत्रणांना अलर्ट झालीय.
14 जानेवारीलाही त्याच नावाने धमकी
यापूर्वीदेखील गडकरी यांना धमकी आल्याने राज्यात खळबळ माजली होती. १४ जानेवारीला बेळगाव तुरुंगातून गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन आला होता. त्याच जयेश पुजारी ऊर्फ जयेश कांता नावाने आज पुन्हा धमकी फोन आला. नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास सुरु केलाय. “गेल्यावेळेस फोन केला तेव्हा पोलीसांना माहिती दिली होती, आता पोलीसांना माहिती देऊ नका, 10 कोटींची खंडणी द्या, त्यासाठी एक नंबर पाठवतोय” अशा प्रकारचे धमकीचा फोन आला. १० कोटींची खंडणी पाठवण्यासाठी एक नंबर देण्यात आलाय.
मुलीचा नंबर दिला?
धमकी देणाऱ्या एक नंबरही दिला आहे. त्या नंबरला १० कोटी रुपयांची खंडणी पाठवावी, असे म्हटले आहे. ती मुलगी बंगलुरु येथे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करत असून, तिचा मित्र कारागृहात असल्याची माहिती डीसीपी राहूल मदने यांनी दिलीय. यामागे खोडसरपणा आहे की काय? याचा तपासही पोलीस करतायत. सायबर पोलीसंही याची चौकशी करतायत.