नागपूर – मुंबई बुलेट ट्रेनचे काम रुळावर येणार कधी; डीपीआर मार्चपर्यंत तरी होणार का?
नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प अहवालाचे काम सुरू आहे. विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) मार्च महिन्यापर्यंत तयार होणार अशी चर्चा आहे. रेल्वे मंत्रालयाची या डीपीआरला मंजुरी घ्यावी लागेल.
नागपूर : नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट रे कॉरिडॉर प्रकल्प हा 2019 मध्ये प्रस्तावित करण्यात आला. हा सहा नव्या बुलेट कॉरिडॉरपैकी एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प तयार करण्यासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून डीपीआर बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. रेल लाईनची अंतिम अलाईनमेंट डिझाईन व प्रायमरी रूट मॅप बनविण्यासाठी आकाशातून सर्वेक्षण करण्यात आले. सप्टेंबर 2020 मध्ये निविदा जारी करण्यात आली. सिकॉन व हेलिका जाइंट व्हेंटर कंपनीला एरिअल सर्वेचे काम देण्यात आले.
रेल्वेनंतर केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी
12 मार्च 2021 ला सुरू झालेले हे काम जुलै 2021 मध्ये पूर्ण झाले. यात हेलिकॉप्टरवर अत्याधुनिक लिड व इमेजनरी सेंसर लावण्यात आले होते. मुंबई ते नागपूरपर्यंत प्रस्तावित रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेतून आकडेवारीचे विश्लेषण केल्यावर डीपीआर तयार करण्यात येईल. डीपीआर मार्चपर्यंत रेल्वे मंत्रालयाकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती आहे. रेल्वे मंत्रालयाच्या मंजुरीनंतर केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट रेल कॉरिडॉर प्रकल्पाचे जमिनीवरील काम सुरू होईल.
ट्रेनची क्षमता साडेसातशे प्रवाशांची
नागपूर-मुंबई हायस्पीड बुटेल रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प 741 किलोमीटर क्षेत्रावर प्रस्तावित आहे. या क्षेत्रात नागपूर, खापरी डेपो, वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव, जहांगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी व शहापूर ही प्रस्तावित थांबे राहणार आहेत. या कॉरिडॉरमध्ये 350 किमी प्रती तास वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे. ट्रेनमध्ये एकावेळी साडेसातशे प्रवासी बसू शकणार आहेत. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच नागपूर ते शिर्डी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या महामार्गाला समांतर मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचा प्रकल्पही प्रस्तावित आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वेचे प्रादेशिक नियंत्रण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या रेल्वेसाठी औरंगाबाद जिल्ह्यात 111 किलोमीटर ट्रॅक निर्माण करण्यात येणार आहेत.