नागपूर : कोरोना संक्रमणाशी लढा देण्यासाठी नागपूर महापालिकेने (Nagpur Municipal Corporation) सत्तेचाळीस डॉक्टर्सची नेमणूक केली होती. त्यांना साठ हजार रुपये मासिक मानधन मिळत होते. शिवाय चाळीस हजार रुपये अधिकचे मानधन देण्यात येत होते. याशिवाय अतिरिक्त 186 परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली होती. या परिचारिकांना शासनाकडून मासिक 30 हजार वेतन दिले जाते. याशिवाय महापालिकेकडून पाच हजार रुपये अतिरिक्त मानधन दिले जात होते. तिसर्या लाटेशी लढण्यासाठी महापालिकेने ही तयारी केली होती. आता तिसरी लाट ओसरत आहे. शिवाय कोरोना सर्दी खोकल्यासारखा आजार झाल्याचे दिसून येत आहे. रुग्ण असले, तरी मृत्यूदर किंवा रुग्णालयात भरत होण्याचा दर खूपच कमी आहे. त्यामुळं महापालिकेवर अतिरिक्त खर्च नको म्हणून 40 डॉक्टर व 53 परिचारिकांना सेवामुक्त (Doctors & Nurses Retired) करण्याचा निर्णय स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर (Standing Committee Chairman Prakash Bhoyar) यांनी घेतला आहे.
कोरोना कालावधीत 436 कर्मचारी व 862 आशा वर्कर यांचीही सेवा महापालिकेने घेतली होती. या कर्मचार्यांनी आपला जीव धोक्यात घालून सेवा दिली. महापालिकेने प्रत्येकी दीड हजार रुपये, तर आशा वर्करला एक हजार रुपये दरमहा अतिरिक्त मानधन दिला. कोरोनाचे संक्रमण अतिशय धोकादायक परिस्थितीत होते. या कालावधीत स्थायी समितीने ही विशेष मंजुरी दिली होती. यामुळे महापालिकेवर 90 लाख सोळा हजार रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा बसत होता. आता गरज संपताच महापालिकेने आर्थिक कारण सांगून या कर्मचार्यांना सेवामुक्त करण्यात आले.
कोरोनाशी लढण्यासाठी नागपूर महापालिकेने आरोग्य कर्मचारी नेमले होते. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही भयानक होती. आता तिसरी लाटही येऊन गेली. ही तिसरी लाट संपताच चाळीस डॉक्टर्स आणि 53 परिचारिकांना सेवामुक्त करण्यात आले. कोरोना संक्रमणादरम्यान, महापालिकेने 47 डॉक्टर्स आणि 186 परिचारिकांची नियुक्ती केली होती. महापालिकेची आर्थिक स्थिती फारसी चांगली नाही, असे कारण देऊन ही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.