Nagpur NMC | नागपूर मनपा निवडणुकीची मोर्चेबांधणी, इच्छुकांचा सोशल मीडियावर धुमाकूळ, हवा कशी तयार होणार?
नागपूर मनपा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठी सारे प्रयत्न सुरू असल्याचं दिसते. फेक न्यूजचाही यासाठी वापर केला जातोय.
नागपूर : महापालिका निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी इच्छुकांनी सोशल मिडियावरून (Social media) मोर्चेबांधणी सुरू केलीय. सध्याचे नगरसेवक किंवा संभाव्य उमेदवाराविरुद्ध नागरिकांचा कौल घेण्यासाठी इच्छुकांकडून सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या जाताहेत. सकारात्मक बाजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी फेक लाईक्स, कमेंट खरेदीसाठीही इच्छुकांनी तयारी सुरू केलीय. गेल्या दहा वर्षात झालेल्या निवडणुकींमध्ये सोशल मीडियाची मोठी भूमिका आहे. यंदा महापालिका निवडणुकीतही (In municipal elections) याच व्यासपीठावरून धुरळा उडणार आहे. सध्याच्या नगरसेवकांबाबत नागरिकांचे काय मत आहे, हे जाणून घेण्यासाठी त्याच प्रभागातील, पक्षातील इच्छुकांनी काही एजन्सीला हाताशी धरण्यात आले. ‘ब्रॅकेट सर्वे’ (Bracket Survey) सुरू असल्याचे सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी सांगितले.
भावी नगरसेवक सक्रिय
सोशल मीडियावरील नागरिकांचे एखाद्याबाबत मत, स्वतःबाबतचे मत यावर अहवाल तयार करण्यात येतोय. त्यासाठी पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारीसाठी जुगाड लावला जात आहे. प्रभागातील नागरिकांचे नाव, वय, लिंग, पता, जात, आर्थिक स्तर व इतर माहिती मिळविण्यासाठी डेटा खरेदीसाठी इच्छुकांनी प्रयत्न सुरू केलेत. ज्यांना डेटा खरेदीचा अनुभव नाही, अशांनी विविध सोशल मीडिया वापरकर्त्याच्या पोस्ट, कमेंटवरून वय, शिक्षण, व्यवसाय, नोकरीबाबत माहिती घेणे सुरू केले आहे. त्यांच्याशी सोशल मीडियावरच संवाद साधण्यात येतोय. यातून सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या उमेदवाराकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेण्यात येत आहेत. इच्छुकच नव्हे तर नगरसेवकही सोशल मीडियावर सक्रीय झाले आहे.
स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न
‘पे फॉर पोस्ट’ डमी लाईक्स, कमेंट इत्यादीच्या माध्यमातून कृत्रिम लोकप्रियता मिळवली जात आहे. संभाव्य विरोधी उमेदवाराबाबत किंवा नगरसेवकाबाबत नकारात्मक पोस्ट तयार करण्यासाठी विद्यार्थी, बेरोजगारांचा आधार घेतला जात आहे. ‘पे फॉर पोस्ट’ तत्त्वावर त्यांना काम दिले जात असून व्हाट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्रामवर पोस्ट टाकणे, व्हिडीओ तयार करण्यासाठी त्यांना मोठे मानधन देण्यात येत आहे. स्वतःची प्रतिमा तयार करण्यासाठी आता फेक सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स उपलब्ध आहे. ते लाईक करतात. पोस्टवर कमेंट करतात. निवडणुकीत हा व्यवसाय मोठा आहे. भाड्याने फ्लॅट घेऊन अत्याधुनिक यंत्रणेचे कॉल सेंटरही उघडले जाईल. यातून अनधिकृत बल्क मेसेजचा मारा केला जाईल. त्यामुळे मतदारांनी जास्त जागृत व सावध राहण्याची गरज आहे, असेही सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी सांगितलं.