शरद पवारांनी कायम ओबीसींच्या विरोधात भूमिका घेतली; कुणा केला गंभीर आरोप?
Parinay Fuke on Sharad Pawar and obc Aarakshan : मराठा- ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. मराठा समाजाला आरक्षण देतानाच ओबीसी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. याच दरम्यान शरद पवारांवर गंभीर आरोप करण्यात आलाय.
ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाऊ नये, यासाठी ओबीसी समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी ओबीसी बांधव उपोषण करत आहेत. सरकारचं शिष्टमंडळ काही वेळात विमानतळावर दाखल झालं आहे. ओबीसी कार्यकर्त्यांची विमानतळावर मोठी गर्दी केलीय. ओबीसी कार्यकर्त्यांची विमानतळावर घोषणाबाजी सुरू आहे. अशातच ओबीसी नेत्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवारांनी मराठा समाजाच्या बाजूने आणि ओबीसी समाजाच्या विरोधात राजकारण केल्याचा आरोप भाजपचे ओबीसी नेते डॉ. परिणय फुके यांनी केला आहे.
शरद पवारांवर गंभीर आरोप
शरद पवार यांनी मराठा राजकारण केलं आहे. ओबीसी विरोधातील राजकारण केलं आहे. शरद पवार हे कायम ओबीसी समाजाच्या विरोधात आहेत. शरद पवार आणि राष्ट्रवादीची काय भूमिका राहिली हे स्पष्ट आहे. शरद पवारांनी ओबीसींसाठी काही केलं नाही. उलट कायम त्यांनी ओबीसी समाजाच्या विरोधात भूमिका घेतली आहे, असा गंभीर आरोप भाजपचे ओबीसी नेते डॉ. परिणय फुके यांनी केला आहे.
मनोज जरांगे यांना पहिल्या दिवशी कोण जाऊन भेटतं? शरद पवार, राजेश टोपे जाऊन मनोज जरांगेंना भेटतात. आता ओबीसीचं आंदोलन सुरू झालं आहे. तर शरद पवारांसोबतच इतर कुणीही त्यांना भेटायला आलं नाही. मनोज जरांगे यांच्या मागे शरद पवार आहेत, असं विधान परिणय फुके यांनी केलंय. जालन्यात ओबीसी बांधव उपोषण करत आहेत. या उपोषण स्थळी ओबीसी बांधवांची गर्दी पाहायला मिळत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून ओबीसी बांधव वडीगोद्रीत दाखल झालेत. विविध संघटनाचे पदाधिकारी देखीव उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी देखील शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.
परिणय फुके यांची भूमिका काय?
आमची भूमिका नेहमी एकच आहे की मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये, असंही परिणय फुके यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचा काही दुसरा हेतू आहे. राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले. यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळाले आणि ओबीसीतून मिळाले. तर राज्यात तेढ निर्माण होईल, हेच मनोज जरांगे यांना पाहिजे आहे.