गजानन उमाटे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नागपूर | 15 डिसेंबर 2023 : पंकजा मुंडे… भाजपच्या वरिष्ठ नेत्या… पंकजा मुंडे दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याचं बोललं जात आहे. राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. यावर भाजपचे वरिष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजाताई आमच्या मोठ्या नेत्या आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तर आनंदचं होईल. पण त्याच्या बाबत आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असं प्रवीण दरेकर म्हणालेत. प्रवीण दरेकर यांनी भाजपच्या तिकीट वाटप कसं होतं? याबाबत प्रवीण दरेकरांनी माहिती दिली आहे.
काही दिवसांआधी पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याबाबत भाष्य केलं. प्रितम मुंडे यांना खाली बसवून मी राजकारणात पुढे जाणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र पंकजा मुंडे भाजपच्या दिल्लीतील राजकीय वर्तुळात जाणार असल्याची चर्चा अद्याप थांबलेली नाही. प्रवीण दरेंकरांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेसाठी आता आमचं मिशन 45 नाही. तर मिशन 48 आहे. आम्ही पॅड बांधून तयार आहे. बॉल आला की बॅटिंग करणार आहोत. केव्हाही निवडणुकीस लागली तरी आम्ही सज्ज आहोत, असं म्हणत आगामी निवडणुकीवर भाष्य केलंय.
लोकसभा किंवा अन्य निवडणुकांसाठी भाजप कसं काम करतं? यावरही प्रवीण दरेकर यांनी भाष्य केलं आहे. भाजप सर्वे करुन लोकसभेच्या निवडणुकीत तिकीट देत असतं. जे नेते लोकप्रिय आहेत. निवडून येण्याची क्षमता आहे. त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळते. या सगळ्याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतात, असं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय.
अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर बारामती लोकसभेची जागा प्रतिष्ठेची झाली आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात युतीमधून बारामतीतून कोण निवडणूक लढणार याची चर्चा होतेय. यावर प्रवीण दरेकरांनी प्रतिक्रिया दिलीय. बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे तिन्ही नेते बसून बारामतीबाबत निर्णय घेणार आहेत, असं दरेकरांनी म्हटलं आहे.
शरद पवार आज अमित शहा यांना भेटण्याची शक्यता आहे. यावर प्रवीण दरेकरांनी प्रतिक्रिया दिलीय.शरद पवार यांचं भविष्य कुणी सांगू शकता का? शरद पवार भविष्यकाराचे अंदाज खोटे ठरवतात, अशी टिपण्णी प्रवीण दरेकरांनी केली आहे.