Nagpur Smart City | नागपूर स्मार्ट सिटी उभारणार ऑटोमेटेड मल्टिलेव्हल वाहन पार्किंग, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
शहरात स्मार्ट वाहतुकीची सुविधा देण्यासाठी 33 चौकांमध्ये कॅन्टिलिव्हर पोल्सवर वाहतूक सिग्नल लावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. नागपूर विमानतळापासून संविधान चौक आणि एल.आय.सी. चौक ते पारडी पर्यंत कॅन्टिलिव्हर लावण्यात येतील. सध्याचे वाहतूक सिग्नल वाहनचालकांना स्पष्टरित्या दिसून येत नाही.
नागपूर : नागपूर शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. बाजारपेठेत पार्किंगसाठी पर्याप्त जागा उपलब्ध नाही. नागपूर महापालिकेतर्फे उपलब्ध करण्यात आलेली जागा सध्या पार्किंगसाठी कमी पडत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे नागपूर शहरात (पॅन सिटी) भागात मॅरीगो राउंड (आकाश झुला) प्रमाणे ऑटोमेटेड/मॅकेनाईज्ड मल्टिलेव्हल कार आणि दुचाकी वाहन पार्किंगची सुविधा निर्माण केली जाणार आहे. नागपूर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने (Board of Directors) या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केलीय. यामुळे नागपूर शहरातील पार्किंगच्या समस्येवर (Parking Problems) दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. स्मार्ट सिटीच्या (Smart City) संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ऑनलाईन माध्यमातून झालेल्या बैठकीमध्ये स्मार्ट सिटीचे मेंटॉर आणि चेअरमन डॉ. संजय मुखर्जी मुंबईहून उपस्थित होते.
दहावीचा निकाल live पाहण्यासाठी खाली क्लिक करा
शहरात चार ठिकाणी वाहन पार्किंग प्रस्तावित
नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, संचालक मंडळ सदस्य अनिरुद्ध शेनवाई, आशिष मुकीम, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे, कंपनी सेक्रेटरी भानुप्रिया ठाकूर आणि मुख्य वित्त अधिकारी नेहा झा उपस्थित होते. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सांगितले की, नागपूर शहरात चार ठिकाणी ऑटोमेटेड/मॅकेनाईज्ड मल्टिलेव्हल कार आणि दुचाकी वाहन पार्किंग प्रस्तावित करण्यात आलंय. महापालिकेच्या मदतीने नागरिकांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अनाज बाजार इतवारी, सुपर मार्केट सीताबर्डी, गांधीसागर तलाव आणि गोकुळपेठ मार्केट येथे मल्टिलेव्हल कार आणि दुचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था प्रस्तावित करण्यात आलीय. चारही ठिकाणी जवळपास 150 कार आणि 600 पेक्षा जास्त दुचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था प्रस्तावित आहे. नागरिकांकडून या भागात पार्किंगची सोय करण्याची मागणी करण्यात येत होती.
33 चौकांमध्ये कॅन्टिलिव्हर पोल्सवर वाहतूक सिग्नल
याशिवाय शहरात स्मार्ट वाहतुकीची सुविधा देण्यासाठी 33 चौकांमध्ये कॅन्टिलिव्हर पोल्सवर वाहतूक सिग्नल लावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. नागपूर विमानतळापासून संविधान चौक आणि एल.आय.सी. चौक ते पारडी पर्यंत कॅन्टिलिव्हर लावण्यात येतील. सध्याचे वाहतूक सिग्नल वाहनचालकांना स्पष्टरित्या दिसून येत नाही. कॅन्टिलिव्हरवर वाहतूक सिग्नल लावण्याने वाहनचालकांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने नागपूर शहरातील सिवर लाईन आणि पावसाळी नाल्यांचे जीआयएस मॅपिंग युक्त ब्ल्यू प्रिंट तयार करण्याकरिता सुद्धा मंजुरी प्रदान केली आहे.
सिव्हरेज लाईनचा विकास आराखडा
गोतमारे यांनी सांगितले, महापालिकेला सिवरेज लाईनचा विकास आराखडा तयार करताना या माहितीचा मोठा लाभ होईल. सिवरेजच्या दृष्टीने नागपूर शहराला उत्तर सिवरेज झोन, मध्य सिवरेज झोन आणि दक्षिण सिवरेज झोन असे तीन भागात विभाजित करण्यात आले आहे. मनपातर्फे 340 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. तसेच नागपूर सुधार प्रन्यासतर्फे 63 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. या तीनही झोनमध्ये 70 टक्के सिवर नेटवर्क आहे. मनपाला विकास आराखडा तयार करण्यासाठी जीआयएस मॅपिंगची आवश्यकता आहे. नागपूर स्मार्ट सिटीतर्फे मनपाला ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. 3 हजार किलोमीटर लांबीच्या सिवर लाईनच्या मॅपिंगसाठी 4 कोटी 80 लाख रुपयांच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी प्रदान केली आहे.