Nagpur Rain| नागपूरला अवकाळी पाऊस, गारपिटीने झोडपले; नेमकं नुकसान झालं किती?
नागपुरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने गेल्या चार दिवसांपासून झोडपून काढले. यामुळं शेतपिकांचे बरेच नुकसान झाले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीचा आढावा घेतला.
नागपूर : जिल्ह्यात आठवड्याभरापासून वातावरणात बदल झाला. दररोज ढगाळ वातावरण राहात आहे. मंगळवारी तर जिल्ह्याला अवकाळी पावसाने (Rain) चांगलेच झोडपले. यामुळे रब्बीसोबतच खरिपातील उभ्या असलेल्या सात हजार पाचशे हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान (Damage) झाले. नागपूर ग्रामीण, पारशिवनी, कामठी, रामटेक व सावनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात या पावसाचा फटका बसला. बुधवारला कृषी विभागाने या नुकसानीचा प्राथमिक आढावा घेतला. सर्वाधिक नुकसान हे पारशिवनी व कामठी तालुक्यात झाल्याचे कृषी विभागातील अधिकार्यांचे म्हणणे आहे. कृषी विभागाच्यावतीने मंगळवारला जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा प्राथमिक आढावा घेतला. त्यामध्ये शेतातील पीक भुईसपाट झाल्याचे दिसून आले. यामध्ये हरभरा, गहू, भाजीपाला व खरीप तुर आदी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
झेडपी सदस्यांचे ग्रामीण भागात दौरे
कोरोनामुळे दोन वर्षापासून शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. अशात हे नुकसान शेतकर्यांच्या चांगलेच जिव्हारी लागणार आहे. बुधवारी कृषी विभागाने गारपीट व अवकाळी पाऊस झालेल्या तालुक्यातील गावांचा आढावा घेतला. यात सात हजार पाचशे हेक्टरवरचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. जि.प.चे कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांच्यासह कृषी विभागाच्या पथकाने पारशिवनी तालुक्यातील करंभाड, भागेमाहरी, इटगाव, पारडी आणि रामटेक तालुक्यातील टुआपार, घोटी या गावात भेटी दिल्या. जि.प. सदस्या कुंदा राऊत यांनी ब्राम्हणवाडा, भरतवाडा, बोखारा, लोणारा, गुमथळा, बैलवाडा, घोगली या गावाला भेटी देऊन तेथील शेती पिकांची पाहणी करुन शेतकर्यांची संवाद साधला. जिल्ह्यात गारपिटीमुळे सर्वाधिक नुकसान हे पारशिवनी व रामटेक तालुक्यात झाले असल्याचे वैद्य व कृषी अधिकार्यांनी सांगितले. नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी तापेश्वर वैद्य यांनी केली आहे.
असे झाले नुकसान
पारशिवनी तालुक्यात पाच हजार 108 हेक्टरमधील शेतमालाचे नुकसान झाले. यात कापूस, तूर, हरभरा, गहू, भाजीपाला तसेच फळबागेचा समावेश आहे. कामठी तालुक्यात एक हजार 182 हेक्टरमधील शेतमालाचे नुकसान झाले. यात कापूस, तूर, हरभरा, गहू, संत्रा यांचा समावेश आहे. रामटेक तालुक्यात 542 हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले. 26 घरांचे अंशतः नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली. सावनेर तालुक्यात एक हजार 103 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.