नागपूर : विधान परिषद निवडणुकीत छोटू भोयर यांचा पाठिंबा काढून ऐनवेळी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना देण्यात आला. याची दखल काँग्रेसच्या नवी दिल्लीतील हायकमांडनं घेतली. यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी काँग्रेसचे नागपुरातील तीनही दिग्गज नेते काल नवी दिल्लीला गेले होते. आपसातील वाद मिटविण्याचे निर्देश हायकमांडनं दिल्याचं बोललं जातंय.
नाना पटोले यांनी नवी दिल्लीला जात असल्याचं सांगितलं होतं. विधानसभा अध्यक्षपदापबाबत चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पण, त्याव्यतिरिक्त नागपुरातील आणखी दोन महत्त्वाचे नेते दिल्लीत दाखल झाले. ते म्हणजे नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आणि पशुसंवर्धनमंत्री सुनील देशमुख. त्यामुळं राजकीय चर्चेला उधाण आलं. एकावेळी तिन्ही नेते दिल्लीला कशाला गेले असतील.
छोटू भोयर हे भाजपाला रामराम ठोकून विधान परिषद निवडणुकीपूर्वी काँग्रेसवासी झाले. लगेच त्यांना विधान परिषदेची तिकीट देण्यात आली. नाना पटोले यांनी यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. पण, सुनील केदार यांना भोयर हे प्रचारात कमी पडल्याचं लक्षात आलं. डॉ. नितीन राऊत यांनाही भोयर यांच्याकडून फारशा अपेक्षा वाटल्या नाहीत. त्यामुळं त्यांनी ऐनवेळी उमेदवार बदलीचा निर्णय घेतला. तरीही काँग्रेसचा दारूण पराभव झाला. याची कारणमीमांसा करण्यासाठी दिल्लीत हायकमांडनं या वरिष्ठ नेत्यांना बोलावल्याची माहिती आहे.
नाना पटोले, नितीन राऊत आणि सुनील केदार यांच्या मतभेदामुळं काँग्रेसवर उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की आली. याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठांनी या तिन्ही नेत्यांना दिल्लीत बोलावले. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव के. सी. वेणूगोपाल यांच्याकडे बाजू मांडल्याचे समजते. या तिन्ही नेत्यांना आपसातील हेवेदावे विसरून कामाला लागा, असं सांगितल्याचं समजतं.
याप्रकरणी छोटू भोयर यांनी नाराजी व्यक्त केली होती. पण, पक्षाचे काम करत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आता नागपूर महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं या निवडणुकीवर या नेत्यांना लक्ष द्यावं लागणार आहे. या निवडणुकीची जबाबदारी दिल्यास आपण पार पाडू, असं सुनील केदार यांना वाटतं.