सुनील ढगे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्षमता राज्यानं बघीतली आहे. त्यांचे काही खासगी व्यवसाय नाहीत. खासगी कारखाने नाहीत. त्यांच्या सोसायट्या नाहीत. फडणवीस हे 18 तास जनसेवेकरिता देताहेत. सहा नाही आठ जिल्हे सांभाळू शकतात. देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्र सांभाळला आहे, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. ते नागपुरात बोलत होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर बोलणं हे सूर्यासमोर दिवा दाखविण्यासारखं आहे. नाना पटोले हे गोंधळलेले आहेत. आता त्यांचा बॅलन्स सुटला आहे.
तसंही नाना पटोले यांना कुणी सिरीअस घेत नाहीत. ते पत्रकार परिषदा घेता राहतात. राहुल गांधी यांच्या जवळचे असल्याचं दाखवत राहतात. आपलं अध्यक्षपदं टिकवत राहतात. त्यांना तुम्हीही सिरीअस घेऊ नका, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
भाजपाबद्दल 2024 पर्यंत खूप मोठं विश्वास तयार झालेला असेल. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस हे 18-18 तास काम करतात. 2024 पर्यंत इनकमिंग सुरू राहणार आहे. मोठे मोठे झटके काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही लागणार आहेत.
कॉंग्रेस युवा विंगचे पवन उके यांच्यासह युवा कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी व वीरेंद्रसिंग चौहान यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात भाजपात प्रवेश घेतला. यावेळी माजी जि.प. सदस्य शंकर चहांदे, भाजयुमो नागपूर ग्रा. उपाध्यक्ष सुरेंद्र बुधे, तालुका अध्यक्ष अतुल हजारे, रामभाऊ दिवटे, हिरालाल गुप्ता, पारस यादव, सौरभ पोटभरे उपस्थित होते.
सरकार गेल्यापासून उद्धव ठाकरे हे टोमणे सभा घेतात. त्या टोमणे सभा त्यांनी बंद करव्यात. नाही तर जे काही शिल्लक आहे तेही जाईल. आपलं कुटुंब आपली जबाबदारी, हम दो हमारे दो एवढंच राहील, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
महाविकास आघाडीनं अडीच वर्षांत राज्याच्या सर्वांगीण विकासाला खिळ लावली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्तेत येण्याचं स्वप्न आता बघू नये. अजित पवार यांच्या वक्तव्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाचार घेतला.
भारत देशाला वाचवायचं असेल, तर पीएफआय संघटनेवर बंदी आणली पाहिजे. राज्यात, देशात पीएफआय जाळं पसरवून टार्गेटेड काम करायचं. यापूर्वीचं मुस्कटदाबी करायला पाहिजे.
काँग्रेसच्या काळात पीएफआयसारख्या संघटना फोफावल्या होत्या. पीएफआयसारख्या संघटनांच्या लोकांना झोडपून काढलं पाहिजे. यानंतर अशा संघटना देशात येऊ नयेत, अशी मागणी मी करेल, असं बावनकुळे म्हणाले.