कोरोनाने सोडलं अन् म्युकरमायकोसिसने घेरलं, तब्बल 1 कोटी 48 लाखांचा खर्च, शेवटी प्राण वाचले ?
नागपुरातील नवीन पॉल यांना तब्बल 1 कोटी 48 लाख रुपयांचा खर्च आला आहे. त्यांना तब्बल 6 वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घ्यावा लागला.
नागपूर : कोरोनामुळे अनेक कुटुंबानी आपले सदस्य गमावले आहेत. अनेकांचा पाहता-पाहता मृत्यू झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मृतांचे प्रमाण बरेच आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा जाणवल्यामुळे उपचारासाठी अनेकांना प्रमाणापेक्षा जास्त खर्च करावा लागला. नागपुरातून तर एक अशी घटना समोर येत आहे, ज्यामुळे सर्वांनी आर्श्चर्य व्यक्त केलं आहे. कोरोनानंतर म्युकरमायकोसिसची लागण झाल्यानंतर नागपुरातील नवीन पॉल यांना तब्बल 1 कोटी 48 लाख रुपयांचा खर्च आला आहे. त्यांना तब्बल 6 वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घ्यावा लागला. (Navin Paul from Nagpur payed total 1 crore 48 lakh rupees for treatment of Mucormycosis and Corona)
कोरोनामुक्तीनंतर म्युकरमायकोसीसची लागण
नवीन पॉल हे आपल्या परिवारासोबत नागपुरात राहतात. कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. योग्य उपचार घेतल्यांतर ते कोरोनामुक्तही झाले. मात्र नंतर त्यांच्या डोळ्यात आग होत असल्याचे त्यांना जाणवत होते. सोबतच दातांचाही त्रास जाणवत होता. त्यांचे दात हलायला लागले होते. त्रास वाढल्यानंतर त्यांनी नागपुरातील डॉक्टरांकडे याविषयी चौकशी केली. त्यानंतर त्यांना हैद्राबाद इथे उपचारासाठी पाठविण्यात आलं. मात्र तिथेसुद्धा विशेष उपचार होऊ शकला नाही.
डॉक्टरांनी घेतला एक डोळा काढण्याचा निर्णय
नंतर नवीन पॉल हे मुंबईला गेले. त्याठिकाणी त्यांनी महिनाभर उपचार घेतला. मात्र तिथेही पाहिजे तसा उपचार झाला नाही. नंतर नागपुरात परत येऊन त्यांनी उपचार घेणे सुरु केले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांचा एक डोळा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर परिवारानेसुद्धा याला सहमती दिली. परिणामी त्यांचा एक डोळा काढण्यात आला.
तब्बल 1 कोटी 48 लाख रुपयांचा खर्च
हे सगळं करत असताना तब्बल सहा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यामुळे त्यांना एकूण 1 कोटी 48 लाख रुपयांचा खर्च आला. त्यांना हे सर्व बील भरावं लागलं. मात्र एवढा खर्च झाला असला तरी पॉल यांचा जीव वाचल्यामुळे त्यांच्या परिवारामध्ये समाधान आहे. नवीन यांच्या पत्नी रेल्वे खात्यात नोकरीला आहेत. नोकरीला असल्यामुळे त्यांना रेल्वेमधून मोठी मदत मिळाली. याच मदतीमुळे जीव वाचवणे शक्य झाल्याचं नवीन पॉल सांगतात.
नातेवाईक तसेच रेल्वे विभागातील सहकाऱ्यांडून मोठी मदत
नवीन पॉल यांच्या पत्नी संगीता यांनी पतीला वाचविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. नवी पॉल यांच्यावर उपचार करण्यासाठी येणारा खर्च हा वाढतच असल्याने त्यांच्या नातेवाईकांनीसुद्धा त्यांना मोठी मदत केली. प्रत्येकजण नवीन पॉल यांचा जीव वाचविण्यासाठी जमेल तशी मदत करायला पुढे येत होता. त्यातच नागपुरातील डॉक्टरांनीसुद्धा मोठे प्रयत्न केले. नवीन यांचा एक डोळा काढावा लागला. मात्र दुसरा डोळा चांगला आणि शाबूत आहे. पती जिवंत असल्यामुळे पॉल यांच्या पत्नी खुश आहेत. या संकटात रेल्वेने जवळपास एक कोटी रुपयांची मदत केली असल्याचं त्या सांगतात. सोबतच त्या सगळ्यांचे आभारसुद्धा मानतात.
दरम्यान, नागपूर आणि विदर्भातील ब्लॅक फंगसचा हा कदाचित पहिलाच रुग्ण असण्याची शक्यता आहे. मात्र या परिवाराला रेल्वे आणि इतरांची मदत झाली नसती तर पॉल यांना वाचवणे शक्य झाले नसते, असे सगळेच सांगत आहेत.
इतर बातम्या :
ठाकरे-मोदी भेटीतून मराठा आरक्षणावर नक्कीच तोडगा निघेल; संजय राऊतांना विश्वास
नागपुरात राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदावर कोणाची वर्णी, दिग्गज स्थानिक नेत्यांमध्ये चुरस
Weather Alert: विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवशी मान्सूनचं आगमन होणार
(Navin Paul from Nagpur payed total 1 crore 48 lakh rupees for treatment of Mucormycosis and Corona)