Video – Nagpur | राष्ट्रवादीचे नेते हे संजय राऊत यांना भेटणार, महाविकास आघाडीतील गटबाजी संपवण्याचे आवाहन
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आजपासून तीन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. संजय राऊतांचा दौरा असला तरी आशा मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. कारण राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे हे संजय राऊत यांची भेट घेणार आहेत. नागपूर मनपा निवडणूक एकत्र लढवण्याची मागणी करणार आहेत.
नागपूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या नागपूर दौऱ्यामुळे शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढलाय. सेनेच्या संघटन बांधणीसाठी राऊतांचा हा नागपूर दौरा आहे. पण संजय राऊतांच्या या दौऱ्यामुळे स्थानिक शिवसैनिकांसोबतच महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या आशाही पल्लवीत झाल्यात. संजय राऊत यांच्या नागपूर दौऱ्याने महाविकास आघाडीला बळ येईल. अशी आशा करत नागपुरात महाविकास आघाडीतील गटबाजी संपवावी. आगामी नागपूर महापालिका निवडणूक (Nagpur Municipal Election) तिन्ही पक्षाने एकत्र लढवावी. या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नागपूर अध्यक्ष दुनेश्वर पेठे (Nagpur President Duneshwar Pethe) हे संजय राऊत यांची भेट घेणार आहेत.
शिवसेनेच्या बैठका चतुर्वेदींच्या घरीच व्हायच्या
शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी संपर्क प्रमुखांच्या कार्यालयातील भेटीगाठींचा कार्यक्रम रद्द करून पदाधिकाऱ्यांच्या सर्व बैठका रविभवन येथे घेण्याचे ठरविलंय. राऊतांचा हा निर्णय शिवसेना संपर्क प्रमुखांना एकप्रकारचे धक्का असल्याचे मानला जातोय. आतापर्यंत नागपुरातील गणेशपेठ शिवसेनाभवन सोडून पक्षाच्या सर्व बैठका संपर्क प्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी यांच्याच कार्यालयात व्हायच्या. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. शिवसेनेला खासगी मालमत्ता केल्याचा आरोप केला जात होता. याची तक्रार मुंबईतील नेत्यांकडे करण्यात आली.
पाहा व्हिडीओ, काय म्हणतात, दुनेश्वर पेठे
आजच्या बैठका रविभवनात होणार
सर्व महत्त्वाच्या बैठका आणि स्थानिक पातळीवर धोरणात्मक निर्णय घेताना शिवसेना भवनचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतरही परिस्थिती फारशी बदलली नव्हती. आता संजय राऊत यांचा कार्यक्रम आखताना महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे आणि किशोर कुमेरिया यांच्याकडे असलेल्या विधानसभेचा आढावा घेण्यासाठी संपर्क प्रमुखांच्या कार्यालयातच बैठका लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुन्हा नाराजी सुरू झाली होती. त्यामुळे संजय राऊत यांनी संपर्क प्रमुखांच्या घरी भोजन आणि कार्यालयाला भेट हा कार्यक्रम कायम ठेवला. बैठका मात्र रविभवनच्या सभागृहात घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आज शिवसेनेच्या बैठका रवी भवनात होणार आहे.
विदर्भात सेनेचे चार आमदार, तीन खासदार
विदर्भात निवडणुकीसाठी ताकद वाढावी म्हणून शिवसंपर्क अभियान सुरु झालंय. संसदेचं अधिवेशन सुरु असताना ते सोडून शिवसेनेचे सर्व खासदार शिवसंपर्क अभियानात आलेत. आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना ताकदीने लढणार आहे. विदर्भ भाजपचा गढ आहे. त्याच विदर्भात शिवसेनेची ताकद वाढलायची आहे. आतापर्यंत युतीत विदर्भात भाजप जास्त जागा लढवत असल्याने शिवसेनेची ताकद कमी राहिली. विदर्भात सेनेचे चार आमदार, तीन खासदार आहेत.