“अजितदादांबाबत राऊतांचं वक्तव्य खपवून घेतलं जाणार नाही”; राष्ट्रवादीनं ठाकरे गटाला सुनावलं..
संजय राऊत यांनी आपली जेवढी जीभ आहे, आपली जेवढी कुवत आहे, ती कुवत पाहून संजय राऊत यांनी बोलावं असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
नागपूर : ठाकरे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये वाकयुद्ध चालू असतानाच आता महाविकास आघाडीतील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे मविआतील वाद कधी थांबणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. खासदार श्रीकांत शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर संजय राऊत यांनी टीका करताच आता राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. अजित पवार यांच्यावर केलेली टीका आम्ही सहन करणार नाही, त्यामुळे नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावे असा इशाराच त्यांनी ठाकरे गटाला दिला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी केलेली टीका आता महाविकास आघाडीत वितुष्ठ आणणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अजित पवार यांच्यावर टीका झाल्यावर आता आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले की, अजितदादांबाबत संजय राऊत यांचं वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही.
त्यामुळे या नेत्यांना आता उद्धव ठाकरे यांनीच आवरायला पाहिजे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. यावेळी अमोल मिटकरी यांनी खासदार संजय राऊत यांना म्हटले आहे की, तुम्ही जर पातळी सोडून बोलत असाल तर आम्ही पण पातळीच्या पलीकडे आहोत असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
संजय राऊत यांनी आपली जेवढी जीभ आहे, आपली जेवढी कुवत आहे, ती कुवत पाहून संजय राऊत यांनी बोलावं असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
कोरोना काळात कोणी काम केलं हे सांगितलं तर संजय राऊत यांची बोलती बंद होईल असं नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
खासदार संजय राऊत यांनी ज्या प्रकारे अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी त्याच ताकदीने उत्तर देण्याची धमकही आमच्यात असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
अमोल मिटकरी यांनी त्यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत त्यांनी म्हटले आहे की, निच प्रवृत्तीचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. या निच प्रवृत्तीच्या संजय राऊत यांनी अजित पवार यांची माफी मागावी अशा स्पष्ट शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
अजित पवार हे कायमच स्पष्टपणे बोलतात, इतरांसारखे त्यांना डावकपट त्यांना जमत नाही,संजय राऊत यांनी तुम्हाला शिशूपालाची उपमा द्यायला भाग पाडू नका असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. हिंदू धर्म थुंकण्याचं समर्थन करत नाही, त्याच प्रमाणे थुंकलेलं चाटत असेल त्याचंही हिंदू धर्म समर्थन करत नाही अशा शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.