नितीन देशमुख म्हणतात, देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाणारच; पोलीस गुन्हे दाखल करणार?
देवेंद्र फडणवीस हे हिंदुत्वाच्या नावाने राजकारण करतात. हिंदू लोकं आजच्या काळातही पाण्यावाचून मरत आहेत.
![नितीन देशमुख म्हणतात, देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाणारच; पोलीस गुन्हे दाखल करणार? नितीन देशमुख म्हणतात, देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाणारच; पोलीस गुन्हे दाखल करणार?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/04/20031118/NITIN-DESHMUKH-1-N.jpg?w=1280)
नागपूर : अकोल्याचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोलापासून तर नागपूरपर्यंत पाणी पदयात्रा काढली. ही पदयात्रा आता नागपूर जिल्ह्यात धडकली. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत जाणार आहे. मात्र फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत जाण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. तरीही पदयात्रा जनतेच्या समस्यांसाठी आहे. या भागातील जनतेला खार पाणी प्यावं लागतं. या भागात होणाऱ्या कामांवर जी स्थगिती आणली आहे ती स्थगिती उठवावी, ही आमची जनतेसाठी असलेली मागणी आहे. त्यामुळे पोलिसांनी जरी परवानगी नाकारली असली तरी आम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत जाणारच असा ठाम निश्चय आमदार नितीन देशमुख यांनी केला.
आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी जनतेसाठी आम्ही हे कार्य करत आहोत. ते करत राहणार असा विश्वास आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केला. देशमुख म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे हिंदुत्वाच्या नावाने राजकारण करतात. हिंदू लोकं आजच्या काळातही पाण्यावाचून मरत आहेत.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/04/20015255/modi-1-n.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/04/19232813/devendra-fadanvis-1-n-.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/04/19223058/shirad-1-n-.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/04/19185123/WASHIM-1-N-.jpg)
आम्ही जेवायला मागत नाही हक्काचं पाणी मागतो
देशात यांचे ९ वर्षांपासून सरकार आहे. राज्यात नऊ महिन्यांपासून सरकार आहे. पदयात्रा काढल्यामुळे स्थगिती हटवतील, अशी अपेक्षा होती. पण,त्यांना दयामाया आली नाही. हिंदू रस्त्यावर पायी पाण्यासाठी चालत आहेत. आम्ही त्यांना जेवायला मागत नाही. हक्काचं पाणी मागतो.
अद्याप स्थगिती उठवली नाही. तो खार पान पट्टा आहे. उद्धव ठाकरे यांनी २२९ कोटी रुपयांची योजना मंजूर केली होती. त्या कामावर सव्वाशे कोटी रुपये खर्च झाले. ६५ टक्के काम झालं. १०० किलोमीटर पाईपलाईन टाकली. त्या कामावर स्थगिती आणण्यात आली.
किडन्या खराब झाल्या
त्या भागातील लोकांना खार पाणी प्यावं लागते. या भागातील लोकांच्या किडन्या खराब झाल्या आहेत. तरीही आई आपल्या बाळाला खारं पाणी पाजते. हे कोणतं राजकारण आहे. हे कोणतं हिंदुत्व आहे. तुमच्या पक्षाचा एक आमदार तुम्हाला पत्र देतो. त्यावर तुम्ही स्थगिती देता, असा सवाल नितीन देशमुख यांनी विचारला.
पायी चालण्यासाठी परवानगी लागते काय?
हजारो लोकं रस्त्याने पायी येत आहेत. तुम्ही पक्षाचे उपमुख्यमंत्री आहात की, महाराष्ट्राचे. पोलिसांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले. वरली, मटका, दारुचे अड्डे सुरू आहेत. याची परवानगी कोण देतो. पायी चालणाऱ्यांसाठी परवानगी लागते का, असा प्रश्न त्यांनी विचारला.