Nagpur Corona | कोरोनाकाळातील विधवांना अद्याप मदत नाही, नागपूर जिल्हाधिकाऱ्यांची 6 जणांना नोटीस
कोरोनामध्ये कमावता माणूस गेलेल्या कुटुंबीयांचे दुःख, वेदना समजून घ्या. संवेदनशीलतेने सर्व दस्तावेज तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी तहसीलदारांपासून अन्य कोणीही मदत करत नसेल तर वरिष्ठांना सांगा. मात्र पुढच्या बैठकीच्या आत सर्व विधवांना आवश्यक योजनांचा लाभ मिळालाच पाहिजे, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी आर. विमला यांनी बैठकीत दिली.
नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती भवनामध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा कृती दल समिती (District Action Team Committee) व मिशन वात्सल्य समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये कोरोना काळात घरचा कर्ता माणूस गमावलेल्या जिल्ह्यातील जवळपास बाराशे विधवा महिलांच्या विविध लाभाच्या योजनाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला सर्व तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी (Child Development Project Officer) उपस्थित होते. तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी भागवत तांबे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा सदस्य सचिव अपर्णा कोल्हे (Secretary Aparna Kolhe), जिल्हा कृती दल समितीतील सर्व सदस्य उपस्थित होते. तालुकास्तरीय कृती दल समितीतील सदस्यांना तालुका स्तरावरील अधिकारी मदत करत नसेल तर त्यांची नावे सांगा. गावपातळीपासून तर तालुका पातळीपर्यंत यंत्रणेतील कोणताही व्यक्ती या कामी मदत करत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मात्र यानंतर जिल्ह्यातील कोणत्याही विधवेला वेळेत योजनेची मदत मिळाली नाही तर संबंधित तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी यावर कडक कारवाई केली जाईल, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले. कोरोनाकाळात विधवांना अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सहा अधिकाऱ्यांना नोटीस पाठविल्याची माहिती आहे.
वेळेत काम न करणाऱ्यांना नोटीस बजवा
आढाव्यामध्ये ज्या तालुका बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी वेळेत कामे पूर्ण केली नाही. त्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांना दिले. यावेळी पुढील बैठकीपूर्वी वारसाहक्क प्रमाणपत्र तयार करणे, शाळेची फी देण्याची कार्यवाही करणे, बालनिधी मिळवून द्यावा. विधवा महिलांना त्यांच्या मताप्रमाणे कौशल्य प्रशिक्षण देणे, आधार कार्ड बनवणे, संजय गांधी निराधार योजनेतून पैसे मिळवून देणे, जन्म-मृत्यू दाखला देणे, जातीचे दाखले देणे यासाठी सर्व यंत्रणेने मदत करावी. मोलमजुरी करणाऱ्या गावातील विधवा महिलांच्या सोयीनुसार त्या ज्या वेळेस घरी असतील त्या वेळेस जाऊन त्यांना मदत करण्याचे, निर्देश यावेळी देण्यात आले.
80 मुलांचे आई-वडील गेले
जिल्ह्यातील 1200 महिलांना त्यांच्या आवडीनुसार त्यांचे शिक्षण व कल बघून व्यवसाय प्रशिक्षण देण्याची सूचना त्यांनी कौशल्य विकास विभागाला दिली. प्रत्येक महिलेला त्यांच्या आवडीच्या विषयात त्यांना कौशल्य मिळाले, पाहिजे असेही त्यांनी सूचित केले. नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोना काळात 80 मुलांचे आई आणि वडील दोघेही मृत्युमुखी पडले आहेत. तर आई किंवा वडील दोघांपैकी एक गमावलेले 3029 मुले आहेत. केंद्र व राज्य शासनामार्फत या मुलांना विविध योजनांचा लाभ देण्याबाबत मिशन वात्सल्य अंतर्गत अभियान सुरू आहे. या अभियानाचाही आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील या संदर्भात शासनाला निर्देश दिले आहेत. कालबद्ध कार्यपूर्ती करण्याचे अपेक्षित आहे.