Fuel Shortages | नागपुरात 40 टक्के पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल नाही, 2-3 दिवसांआड पुरवठा, पंपांवर ठणठणाट, इंधनासाठी धावाधाव
नागपूर जिल्ह्यात एचपी आणि आयओसीच्या पंपांना वर्धाजवळील नायरा डेपोतून पेट्रोल मिळते. बीपीसीएलच्या पंपांना वर्धा मार्गावरील बोरखेडी येथील डेपोतून पेट्रोल मिळते. जिल्ह्यात वीस हजार लीटर टँकरची मागणी आहे. पण, पुरवठा फक्त बारा हजार लीटर टँकरचाच होत आहे. रक्कम भरूनही पेट्रोल मिळत नसल्याचं विक्रेते सांगतात.
नागपूर : नागपुरातील 40 टक्के पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल नाही. तेल कंपन्यांकडून पेट्रोल पंपांना पेट्रोल – डिझेल कमी पुरवठा होत आहे. दोन ते तीन दिवसाआड पुरवठा होत असल्याने अनेक पेट्रोलपंप बंद पडलेत. नागपूर जिल्ह्यातील 123 पेट्रोल पंपांपैकी 40 टक्के पेट्रोल पंप बंद पडलेत. वाहनचालकांना पेट्रोल आणि डिझेलसाठी (Diesel) वणवण फिरावं लागतंय. नागपुरात सध्या पेट्रोल, डिझेलसाठी धावाधाव सुरू आहे. पंपांसमोर रांगा लागलेल्या दिसतात. कारण 40 टक्के पेट्रोल पंपांवर (Petrol Pumps) पेट्रोल- डिझेल नाही. त्यामुळं उर्वरित पंपांकडं ग्राहक (Consumers) धाव घेतात. पुन्हा पेट्रोल पंपावर रांगेत राहावे लागू नये म्हणून जास्त पेट्रोल भरून घेत आहेत. अशी परिस्थिती काही पेट्रोल पंपांवर होती. मध्यंतरी त्यात सुधारणा झाली. पण, पुन्हा टंचाईसदृश्य परिस्थिती नागपुरात निर्माण झाली आहे.
कंपन्यांचा लाखो रुपये तोटा
नागपूर जिल्ह्यात इंधन तुटवडा हा एप्रिलपासून आहे. इंधन कंपन्यांकडं रोख रक्कम भरल्यानंतरही दोन ते तीन दिवस पुरवठा होत नाही. सेंट्रल एव्हेन्यू्च्या एचपी पंपचालकानं पुरवठ्याअभावी महिन्यातून 20 दिवस पंप बंद ठेवला. अशीच काहीसी परिस्थिती इतर पंपचालकांची आहे. इंडियन ऑईलच्या पंपांवर आधी तुटवडा नव्हता. आता तिथंही इंधनाची कमतरता जाणवत आहे. कंपन्यांना दररोज लाखो रुपयांचा तोटा होत असल्याचं सांगितलं जातं. पंपावर गेल्यानंतर पेट्रोल नसल्यास दुसऱ्या ठिकाणी जावं लागते. तोपर्यंत गाडीत पेट्रोल पुरला नाही. तर ढक्कलगाडी करावी लागते, अशी परिस्थिती नागपुरात निर्माण झाली आहे.
मागणी-पुरवठ्याचं गणित काय
नागपूर जिल्ह्यात एचपी आणि आयओसीच्या पंपांना वर्धाजवळील नायरा डेपोतून पेट्रोल मिळते. बीपीसीएलच्या पंपांना वर्धा मार्गावरील बोरखेडी येथील डेपोतून पेट्रोल मिळते. जिल्ह्यात वीस हजार लीटर टँकरची मागणी आहे. पण, पुरवठा फक्त बारा हजार लीटर टँकरचाच होत आहे. रक्कम भरूनही पेट्रोल मिळत नसल्याचं विक्रेते सांगतात. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्यानं 40 टक्के पेट्रोलपंप कोरडेठाण आहेत. यामुळं ग्राहकांना पेट्रोलसाठी भटकंती करावी लागते. लांब रांगेत उभे राहून पेट्रोल खरेदी करावे लागत आहे.