Nagpur Health : क्षयरुग्णांना पोषण आणि सामाजिक सहाय्य योजना, कम्युनिटी सपोर्ट टू टीबी पेशंट उपक्रम
या यंत्रणेद्वारे नागपूर शहराअंतर्गत उपचाराखालील क्षयरुग्णांना किमान एक वर्षासाठी दत्तक घेऊन रुग्णांना पोषण सहाय्य, व्यावसायिक समर्थन, निदानात्मक सहाय्याद्वारे मदत प्रदान करणे अपेक्षित आहे.
नागपूर : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MOHFW) यांच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजना अंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत या उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. सदर उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या दृष्टीने समाजातील विविध स्तरावर काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींसोबत समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. केंद्रीय क्षयरोग विभाग, (MOHFW) ने टीबी रुग्णांना पोषण आणि सामाजिक योजना अंतर्गत कम्युनिटी सपोर्ट (Community Support) टू टिबी पेशंट हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षयरुग्णांना उत्तम निदान, उपचाराच्या सुविधा या सोबतच पोषण आहार योजना दिली जाते. या व्यतिरिक्त सुध्दा ज्यादाचा पौष्टिक आहार (शिधा, फूड बास्केट, अंडी, मिल्क पावडर व प्रोटीन पावडर) व इतर निदान उपचार सुविधा, व्यावसायिक पुनर्वसन याकरिता त्यांना मदत करावी, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
क्षयरुग्णांना दत्तक घ्या
या उपक्रमाअंतर्गत, गैर सरकारी व सामाजिक संस्था, व्यक्ती, सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही उद्योग संघटना, कॉर्पोरेट्स, औद्योगिक स्वयंसेवी संस्था, व्यापारी असोसिएशन आणि खासदार, आमदार, नगरसेवक व समाजातील सामाजिक कार्यकर्तेद्ध आणि भागीदार यांनी मदत करावी. क्षयरोग मुक्त भारत उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने समन्वय साधण्यासाठी शहर क्षयरोग कार्यालयामार्फत यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. या यंत्रणेद्वारे नागपूर शहराअंतर्गत उपचाराखालील क्षयरुग्णांना किमान एक वर्षासाठी दत्तक घेऊन रुग्णांना पोषण सहाय्य, व्यावसायिक समर्थन, निदानात्मक सहाय्याद्वारे मदत प्रदान करणे अपेक्षित आहे.
येथे साधावा संपर्क
सदर योजनेमध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना सहायता म्हणून https://tbcindia.gov.in पोर्टलवर स्वतःचे, संस्थेची नोंदणी करावी. किंवा शहर क्षयरोग कार्यालय, सदर रोगनिदान व अनुसंधान केंद्र, रेसीडेन्सी रोड, कॅनरा बँकेसमोर, सदर नागपूर येथे प्रत्यक्ष भेट द्यावी. किंवा dtomhngc@rntcp.prg या ई-मेल आयडी द्वारे निक्षय मित्र म्हणून संपर्क साधावा, असेही आवाहन मनपा आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार यांनी केले आहे.