सत्तारांचा राजीनामा मागता मागता खडसे आणि बावनकुळेंच्या घोटाळ्याचीही चौकशीची झाली मागणी; ठाकरे गटाची नेमकी मागणी काय..?
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या घोटाळ्यावरून राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच आता चंद्रशेखर बावनकुळेंची चौकशी केली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
नागपूरः हिवाळी अधिवेशनामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच आता थेट कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. विरोधकांच्या या मागणीने जोर धरला असून येणाऱ्या काळातच आता सत्तारांच्या राजीनाम्याविषयी मुख्यमंत्री काय निर्णय घेतात त्याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या संदर्भात बोलताना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कोणता किती कोट्यवधींचा घोटाळा केला आहे याविषयी माहिती दिली आहे.
त्यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, वाशिम जिल्ह्यातील गायरान जमिनीचा प्रश्न न्यायालयात असतानाही तत्कालीन महसूल विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी 37 एकर जमीन हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे नागपूर हाय कोर्टानेही त्यावर ताशेरे ओढले आहेत. त्याच बरोबर 50 हजारचा दंडही ठोठवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या घोटाळ्याची चौकशी करून त्यांनी राजीनामा द्यावा अशा मागणी विरोधी गटातील आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे.
विरोधकांकडून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणीने जोर धरला असतानाच आता सत्ताधाऱ्यांनी थेट राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्याही खाण घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यावर अंबादास दानवे यांनी बोलताना सांगितले की, खडसे यांच्या खाणकाम घोटाळ्याची चौकशी सुरू आहे.
आणि एकनाथ खडसे यांच्या घोटाळ्याची चौकशी करणार असाल तर त्यांच्याबरोबरच चंद्रशेखर बावनकुळे यांचीही चौकशी करावी लागेल असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. त्यामुळे अब्दुल सत्तारांच्या राजीनामा मागणीवर आता विरोधक काय भूमिका घेतात त्यावर विरोधकांची पुढील भूमिका काय असणार हे कळणार आहे.
चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या खामकाम घोटाळ्याची चौकशी मागणी केली असली तरी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही नावाची चौकशी करावी लागेल असं अंबादास दानवे यांनी सांगितले आहे.
हिवाळी अधिवेशनामध्ये सीमावादाबरोबरच दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावरही सत्ताधाऱ्यांनी गंभीर आरोप केले असल्याने हिवाळी अधिवेशनामध्ये आता नेमकं काय घडणार आहे याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.