Special Report : आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना, जयंत पाटील मस्करीत बोलले की, नव्या युतीची चर्चा?
जयंत पाटील कदाचित मस्करीतही बोलले असतील. पण जयंत पाटलांच्या या नव्या व्हिडीओवरुन, तर्कवितर्कांनाही उधाण आलंय.
नागपूर : शिवसेना आमची, शिवसेना राष्ट्रवादीची असं जयंत पाटील म्हणाले. यावरून शिंदे गटाला टीकेची संधी मिळाली. पण, जयंत पाटील मस्करीत बोललेत की, नव्या युतीची चर्चा आहे, यावरून तर्कवितर्क सुरू झालेत. शिवसेना आमची, शिवसेना राष्ट्रवादीची असं म्हणतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ नागपूरच्या अधिवेशनातला आहे. जयंत पाटील म्हणतायत की, शिवसेना आमची, शिवसेना राष्ट्रवादीची. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवही त्यांना दुजोरा देत आहेत. भास्कर जाधवही म्हणतायत, राष्ट्रवादीचीच…
जयंत पाटील जेव्हा शिवसेना राष्ट्रवादीची म्हणतायत. त्यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवारही तिथेच आहेत. मात्र हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अजितदादांनीही आपली प्रतिक्रिया दिलीय. शिवसेना, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचीच आहे. जयंत पाटलांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नका, अजित पवार म्हणालेत.
ठाकरेंची शिवसेना आता राष्ट्रवादीचीच झालीय, असं शिंदे गट म्हणतोय. महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही शिवसेना आणि राष्ट्रवादीचाच दबदबा आहे, असं बोललं जायचं. मध्यंतरी काँग्रेसची एकला चलो रेची भूमिका आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या जवळीकीमुळं या दोघांचीच आघाडी होते की काय ?, अशीही चर्चा होती. त्यावेळीही जयंत पाटलांनीच, सूचक संकेत दिले होते.
जयंत पाटील कदाचित मस्करीतही बोलले असतील. पण जयंत पाटलांच्या या नव्या व्हिडीओवरुन, तर्कवितर्कांनाही उधाण आलंय. अजित पवार म्हणतात, चर्चेसाठी बरेच विषय आहेत. त्यावर चर्चा करा. आमचं आम्ही बघू.
काही कारण नसताना ध चा मा करण्याचा प्रयत्न करू नका. बाळासाहेब ठाकरे यांनी ती संघटना काढली. शिवाजी पार्कवर त्यांनी शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरे यांच्याकडं सोपविली. युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्याकडं दिलेत. जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा काहीतरी वेगळा अर्थ काढू नका, असंही अजित पवार म्हणाले.