नागपूर | 13 डिसेंबर 2023 : संसदेवरील हल्ल्याला 22 वर्षे पूर्ण होतानाच देशाला पुन्हा एक हादरा बसला. थेट लोकसभा सभागृहात घुसून दोन तरुणांनी स्मोक क्रॅकर उघडले. तर बाहेर दोघांनी घोषणाबाजी केली. भारत माता की जय म्हणत लक्ष वेधले. अचानक घडलेल्या या घडामोडींमुळे एकच गोंधळ उडाला. यामधील अमोल धनराज शिंदे हा महाराष्ट्रातील आहे. तो लातूरमधील चाकूर तालुक्यातील झरी-नवकुंड येथील रहिवाशी असल्याचे समोर येत आहे. असे धक्कादायक कृत्य करण्यामागे या तरुणांचा हेतू काय होता? त्यांचे आंदोलन कशासाठी होते, यावर आता खल करण्यात येत आहे. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात पण हा मुद्दा ऐरणीवर आला.
काय घडले संसदेत
आज 13 डिसेंबर रोजी संसदेवरील हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि नंतर कामकाजाला सुरुवात झाली. प्रेक्षक गॅलरीत आज पोलिसांची संख्या कमी होती. कामकाज सुरु झाल्यानंतर अचानक दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उड्या मारल्या. त्यांनी लोकसभा सभागृहात लक्ष वेधण्यासाठी स्मोक क्रॅकरचा वापर केला. त्यामुळे सभागृहात पिवळा धूर पसरला. त्यामुळे नाकाला झिणझिण्या आल्याचे खासदारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कामकाज सुरु असतानाच दोन तरुणांनी संसदेच्या आत तर दोघांनी बाहेर गोंधळ घातला.
लातूरमधील अमोल शिंदे ताब्यात
या प्रकरणात लातूरमधील अमोल शिंदे याला संसदेच्या बाहेरुन ताब्यात घेण्यात आला. तो चाकूर तालुक्यातील झरी-नवकुंड येथील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. त्याने बाहेर घोषणाबाजी पण केली. त्याच्यासोबत संसदेच्या बाहेर निदर्शनं करणारी नीलम नावाची महिला पोलिसांच्या ताब्यात आहे. हरयाणातील महिला पोलिसांच्या ताब्यात आहे. ज्या लोकांनी गोंधळ घातला. ते मैसूरचे प्रतापराव सिंह खासदाराच्या पासवर हे लोक संसदेत आले होते. तर मध्यप्रदेशमधील खासदारांच्या मदतीने हे पास बनवण्यात आले होते. या प्रकरणाची आता आयबी टीमकडून चौकशी होत आहे. काही वेळासाठी संसदेचं कामकाज स्थगित केलं गेलं. नंतर कामकाज सुरळीत सुरु झाले.
हिवाळी अधिवेशनात पण पडसाद
संसदेतील या गदारोळाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला दिली. सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तरुणाचे नाव समोर आल्याने त्याविषयीची चौकशी करण्यात येत आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा महाराष्ट्रातील तरुण यामध्ये सापडल्याने आणि सध्या मराठा आंदोलक आक्रमक असल्याने त्याच्याशी याचा काही संबंध आहे का? की इतर काही कारण आहे, त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील का याविषयी माहिती विचारली. या प्रकरणातील तरुणांची चौकशी सुरु आहे, संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर सभागृहाला अवगत करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.