पंतप्रधान मोदींचे शॉर्टकटच्या राजकारणावर ताशेरे, अप्रत्यक्षपणे ‘या’ पक्षाला केले टार्गेट!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर येथे विकास कामांचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी नाव न घेता राजकीय पक्षावर टीका केली.
नागपूर, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज नागपूरमध्ये अनेक विकासकामांचे लोकार्पण केले. नागपूरला मुंबईशी जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Expressway) नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याच्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी नागपूरच्या एम्स रुग्णालयाच्या आरोग्य सेवांचेदेखील औपचारिक उदघाटन केले. यावेळी त्यांनी कार्यक्रम स्थळावरून देशाला संबोधितदेखील केले. त्यांनी भाषणाची सुरवात मराठीत केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले.
मराठीत केली भाषणाला सुरवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरवात मराठीतून केली. ” आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतेही काम सुरू करताना आपण प्रथम गणेश पूजन करतो. टेकडीच्या गणपती बाप्पाला मी वंदन करतो” असे म्हणत त्यांनी मराठीत संवाद साधला.
यापूर्वीदेखील त्यांनी देहू येथील मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमात मराठीत संवाद साधला होता. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ओव्यांचा त्यांनी उल्लेख केला होता.
समृद्धी महामार्गाचे श्रेय शिंदे-फडणवीस सरकारला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्गाचे श्रेय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना दिले. या दोघांच्या प्रयत्नांमुळे महामार्ग जलद गतीने तयार झाल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या विकासामध्ये समृद्धी महामार्ग महत्त्वाची भूमिका निभविणार असे यावेळी पंतप्रधान म्हणाले.
लोकार्पणाच्या मंचावरून राजकीय बाण!
नागपूर येथील विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना त्यांनी अप्रत्यक्ष पणे आम आदमी पार्टीवर निशाणा साधला. काही राजकीय पक्ष राजकारणात शॉर्टकट वापरात आहेत असे म्हणत त्यांनी नाव न घेता अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. शॉर्टकट वापरून काही राजकीय पक्ष देशाच्या अर्थव्यवस्थेशी खेळात आहेत, ‘आमदनी अठ्ठणी और खर्चा रुपया’ असे म्हणत त्यांनी आम आदमी पार्टीवर टिकास्त्र सोडले.